तीन दिवसांत 68 हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश

‘आरटीई’ प्रवेश :पालकांना प्रवेशाबद्दल एसएमएस येणे सुरू

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार “आरटीई’च्या 25 टक्के प्रवेशाअंतर्गत तीन दिवसांत 67 हजार 706 विद्यार्थ्यांचा नंबर लागला आहे. यातील 3 हजार 189 विद्यार्थ्यांनी पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करुन शाळांमध्ये प्रवेशही घेतला आहे.

राज्यात “आरटीई’साठी 9 हजार 195 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 779 प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. याकरीता 2 लाख 44 हजार 933 ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. प्रवेशाच्या उपलब्ध जागांसाठी दुप्पटीने अर्ज दाखल झाल्यामुळे प्रवेशासाठी मोठी चूरस निर्माण झाली आहे. राज्यस्तरीय प्रवेशासाठी नुकतीच लॉटरीही काढण्यात आली आहे. संगणक प्रणालीद्वारे रॅंडम पद्धतीने डेटा रनही करण्यात आला. त्यानंतर बुधवार(दि.10) पासून पालकांना प्रवेशाचे “एसएमएस’ येण्यास सुरुवात झाली आहे. काही पालकांना “एसएमएस’ न आल्यामुळे त्यांना पोर्टलवर अर्ज क्रमांक टाकून माहिती मिळवावी लागत आहे. टप्प्याटप्प्याने प्रवेशाची प्रक्रिया पुढे सरकत राहणार आहे.

राज्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यात 963 शाळांमध्ये 16 हजार 580 प्रवेशासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यात 12 हजार 566 प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नंबर लागला असून यातील 1 हजार 155 विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये प्रवेशही निश्‍चित झाले आहेत. सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी 46 शाळांमध्ये 353 प्रवेशाच्या जागा आहेत. या ठिकाणी 94 विद्यार्थ्यांचा नंबर लागला असून एका विद्यार्थ्यानेच आत्तापर्यंत प्रवेश घेतला आहे. वीस ब्लॉकच्या ठिकाणी पडताळणी समिती सज्ज ठेवण्यात आलेली आहे. या समितीमार्फत कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळांमध्ये अंतिम प्रवेश देण्यात येतो आहे.

प्रवेशासाठी नंबर लागलेल्या पालकांनी तात्काळ पडताळणी समितीकडे धाव घेण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र ही पडताळणी करण्यासाठी खूप वेळ जात आहे. समितीच्या कार्यालयांचे पत्ते शोधण्यासाठीही पालकांना कसरतच करावी लागत आहे. प्रवेश निश्‍चित झालेल्या शाळांची माहिती मिळविण्यासाठीही पालकांनी हालचाली सुरु ठेवल्या आहेत. काही पालकांना अपेक्षेप्रमाणे पाहिजे ती शाळा मिळाल्यामुळे आनंद झाला आहे. तर काही पालकांचा अपेक्षा भंग झाल्याचे चित्रही पहायला मिळत आहे.

जिल्हानिहाय प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या
अहमदनगर-1556, अकोला-1865, अमरावती-2121, औरंगाबाद-3839, भंडारा-800, बीड-1602, बुलढाणा-1609, चंद्रपूर-1057, धुळे-810, गडचिरोली-510, गोंदीया-766, हिंगोली-426, जळगाव-2012, जालना-2584,कोल्हापूर-1068, लातूर-1423, मुंबई-3232, नागपूर-5701, नांदेड-2335, नंदुरबार-140, नाशिक-3517, उस्मानाबाद-659, पालघर-388, परभणी-919, पुणे-12566, रायगड-2171, रत्नागिरी-210, सांगली-601, सातारा-933, सिंधुदुर्ग-94, सोलापूर-1070, ठाणे-5896, वर्धा-1107, वाशिम-543, यवतमाळ-1286.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.