रोहित पाटील ः नितीन यादव यांच्या घरी दिली भेट
वाघळवाडी- भाजप सरकारच्या काळात जी गुन्हेगारीची संख्या वाढली होती. त्यावर हे महाविकास आघाडीचे सरकार अंकुश आणेल, असा विश्वास माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव व युवा नेते रोहित पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
करंजेपुल (ता. बारामती) येथील नितीन यादव यांच्या घरी पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
रोहित पाटील म्हणाले की, स्व. आर. आर. पाटील राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी नेहमीच राज्यातील महिला, ज्येष्ठ नागरिक व जनतेला पोलिसांकडून सन्मानाची व न्यायाची वागणूक मिळेल यासाठी प्रयत्न केले व राज्यातील गुन्हेगारीच मोडीत काढण्याचे काम केले, परंतु मध्यंतरी भाजप सरकारच्या काळात राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. वाढलेल्या या गुन्हेगारीवर हे सरकार निश्चितच लगाम घालेन.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे तरुण कार्यकर्त्यांची संख्या मोठी असून त्यांना दिशा दाखवण्याचे काम या वयातही शरद पवार करत असून ते आमच्यासाठी आदर्शवत असल्याचे रोहित पाटील म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचा मी चाहता असून प्रशासनावर वचक व सर्वसामान्यांना त्वरित न्याय अजित पवार लगेच देतात असेही पाटील म्हणाले.
- आमदार रोहित पवार यांनी राबविलेली निवडणुकीतील यंत्रणेचा मी माझ्या मतदार संघातही प्रयोग राबवला त्याचा खूप चांगला फायदा झाला. काही दिवसांत बारामतीचा विकासाचा पॅटर्न अभ्यास करण्यासाठी मी बारामतीत येऊन मुक्काम करणार आहे.
रोहित पाटील