67 वर्षांपूर्वी प्रभात : स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपतींचा संदेश

शनिवार ता. 15 माहे ऑगस्ट सन 1953

भारतीय जनतेचे सुख-विश्‍वकल्याणार्थ प्रयत्नांची पराकाष्ठा करुंया 

स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपतींचा संदेश

दिल्ली, ता. 14 : स्वातंत्र्याच्या सहाव्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी राष्ट्रास पुढील संदेश दिला आहें- 

“”आपल्या स्वातंत्र्याच्या या सहाव्या वाढदिवशी, आपल्या जनतेचें सुख आणि एकंदरीत जगाचे कल्याण यासाठीं प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याच्या महान कामगिरीस आपण पुनः एकदा वाहून घेऊया. ही कामगिरी म्हणजे एक मोठी जबाबदारी आहें, तशी स्वातंत्र्याबरोबर येणारी ती एक हक्‍काचीं बाबही आहें. केवळ आपल्या देशालाच नव्हे, तर अखिल मानव जातीला शांतता आणि उत्कर्षाप्रत नेणाऱ्या तत्त्वांनाच आपण वाहून घ्याचे आहें, याबाबतीत मागे वळून पाहता, शांततेसाठी आपण केलेल्या प्रयत्नांस विशेषतः कोरियांत, यश येण्याची चिन्हे दिसत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहें. 

भारत-पाक वाद आपण स्नेहानेच सोडवूं.. 

“”भारताने आपल्या शेजारी राष्ट्रांशीं विशेषतः पाकिस्तानशी, संबंधही हळूहळू सुधारू लागल्याची चिन्हे दिसत आहेत, ही गोष्टही आपल्या दृष्टीनें तितक्‍याच महत्त्वाची आहे. उभय देशांतील तंग वातावरण निवळले आहें, एवढेच नव्हे तर उत्तम शेजारधर्माचेही वातावरणही सध्या निर्माण झाले आहे. महत्त्वाचे प्रश्‍न सोडविण्यासाठीं काही दिवसांपूर्वी सुरू झालेली बोलणी उभयपक्षी समाधानकारकरीत्या यशस्वी होतील अशी आपण आशा करूया. यशापयशाचा विचार न करता, कोणताही आंतरराष्ट्रीय तंटा सोडविताना शांततापूर्ण वाटाघाटीचा मार्ग चोखळण्याचा आमचा निर्धार आहे. 

कल्याण-राज्य स्थापना..

“”भारतात कल्याण-राज्याची स्थापना करण्यास आपण घटनेनें बांधलेले आहोत. या इप्सित ध्येयापर्यंत शक्‍य तितक्‍या लवकर जाण्यासाठी सर्व काहीं करण्याचा आमचा निश्‍चय आहे. सरकार आणि शेतकरी यातील मध्यस्थी दूर करण्याच्या कार्यक्रमांत बहुतेक राज्यांनी प्रगति केली आहें. 

देशाचा मान राखा..

“”त्याचप्रमाणे आपण भारताचे अधिकृत दूतच असून आपल्या देशाची अब्रू आपल्याच हातात आहें या गोष्टीची परदेशातील नागरिकांनी आठवण ठेवावी. त्यांनी आपल्या मातृभूमीच्या नावास कमीपणा येणार नाहीं अशा रीतीने वागण्यास सांगण्याची ही संधी मी घेत आहें. या आनंदाचें दिवशी भारतातील तसेच परदेशातील आपल्या जनतेला मी मनःपूर्वक शुभ चिंतितो.” 

Leave A Reply

Your email address will not be published.