अबाऊट टर्न : सायबर-शिकारी

-हिमांशू

मोठमोठ्या मुद्द्यांच्या पार्श्‍वभूमीवर लहानसहान घटना बिचाऱ्या खूपच दुर्लक्षित ठरल्यात. अर्थात, आपल्याकडे हे काही नवीन नाही. कोणत्याही मुद्द्याचं किंवा घटनेचं “वजन’ आपणच ठरवतो आणि त्यानुसार आपल्या ताटात मुद्दे वाढले जातात. उदाहरणार्थ, बॉलिवूडमध्ये शिरलेला ड्रग्जचा व्हायरस खरोखर खतरनाक आहे, यात शंकाच नाही. परंतु कोणत्या अभिनेत्रीला चौकशीदरम्यान कोणते प्रश्‍न विचारले जातील, हे काही “जाणकारांनी’ चौकशीच्या आधीच जाहीर करून टाकलं. ही प्रश्‍नावली “एनसीबी’लासुद्धा चौकशीदरम्यान खूप उपयोगी पडली असेल, याबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. 

दुसरीकडे, सीमेवरचा तणाव हा आपल्या समोरचा सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्‍न असून, वातावरण निवळण्याची सर्वचजण वाट बघत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, चार दिवसांपूर्वी मांडली गेलेली जिनपिंग यांची कुंडली आमच्यासाठी धक्‍कादायक ठरली. आमचा विश्‍वास आहे की नाही, हा प्रश्‍न आमच्या इतकाच क्षुल्लक आहे; पण जिनपिंग यांच्या कुंडलीत राहू कोणत्या घरात प्रवेश करतो आहे आणि त्याचा परिणाम आपल्यासाठी किती धोकादायक ठरणार आहे, हे ऐकून कितीतरी लोक दचकत असतीलच ना? सीमेवर चीन आणि पाकिस्तान एकत्र येऊन आपल्यासमोर आव्हान उभे करत असतानाच सीमेच्या आतसुद्धा सर्वकाही आलबेल नाही. करोना विषाणूचा प्रसार वाढत असतानाच रस्तोरस्ती गर्दी वाढली आहे आणि ती जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी नसून, जीवनमरणाच्या प्रश्‍नावर संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्यांची ही गर्दी आहे.

अशा या गुंतागुंतीच्या पार्श्‍वभूमीवर “नव्यानं आणि सक्‍तीनं ऑनलाइन येऊ लागलेल्यांच्या समस्या’ हा मुद्दा चटकन कुणाच्या लक्षातसुद्धा यायचा नाही. नव्यानं तंत्रज्ञानाला भेटू पाहणाऱ्यांची अनेक पातळ्यांवर कोंडी तर होतेच आहे; पण या नवागतांसाठी सायबर चाचे पावलापावलावर जाळं पसरून बसले असल्याची माहिती पुढं आलीय. एखाद्याला नेटवर्क मिळत नाही, तर दुसऱ्याला डेटा परवडत नाही, अशा स्थितीत आर्थिक व्यवहार, शैक्षणिक वाटचाल आणि मनोरंजन या तीन प्रमुख कारणांसाठी नव्यानं ऑनलाइन येणाऱ्यांची संख्या लॉकडाऊनच्या काळात प्रचंड वाढली आहे. लॅपटॉप आणि मोबाइलबरोबरच इंटरनेटचा वापर वाढलाय.

सायबर गुन्हेगारांसाठी हे सुगीचे दिवस ठरलेत आणि अशा गुन्ह्यांमध्ये तब्बल 500 टक्‍के वाढ झालीय, ही बातमी गंभीर मानायला हरकत नसावी. राज्याच्या सायबर शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलं ऑनलाइन क्‍लाससाठी मोबाइल आणि अन्य गॅजेट हातात घेतात आणि पालकांना कळू न देता सोशल साइट्‌सवर जातात. तिथं अनेकदा आपली खासगी माहिती आणि आवडीनिवडींचे तपशील देतात. या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो, याची त्यांना कल्पनाही नसते आणि पालकांना तर काही माहीतच नसतं. जाळं पसरून बसलेल्या शिकाऱ्यांना नवागत नेटकऱ्यांच्या रूपानं शिकार मिळते.

आपण डिजिटल क्रांतीची भाषा करतो. देशातली सगळी क्षेत्रं हळूहळू डिजिटल करण्याचं स्वप्न पाहतो. परंतु सायबर सुरक्षितता हा विषय आपण जणूकाही ऑप्शनलाच टाकलाय. ना इंटरनेटच्या वापरकर्त्यांना या विषयाची जाण आहे, ना शासकांना पुरेसं भान आहे. ना पुरेशी सुरक्षा यंत्रणा आहे, ना ठोस कायद्यांचं पाठबळ आहे. जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात बसलेला माणूस इंटरनेटच्या नव्या वापरकर्त्यांना जाळ्यात ओढतो, त्यांच्याशी मैत्री करतो आणि नको तो डेटा मिळवतो, या प्रक्रियेला उतारा काय?

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.