दखल : सौरचक्र बदलाची चिंता

-प्रा. विजया पंडित

शास्त्रज्ञांनी सौरचक्र बदलल्यामुळे निर्माण झालेल्या एका “सनस्पॉट’चा शोध लावला असून, लवकरच तो पृथ्वीच्या दिशेने वळेल असे सांगितले जात आहे. सूर्याच्या आवर्तनामुळे पृथ्वीच्या दिशेला त्याचा जो भाग येतो, त्यावरील प्रखर ऊर्जेचे केंद्र म्हणजे सनस्पॉट होय. असा सनस्पॉट पृथ्वीच्या दिशेने वळल्यास त्याचे परिणाम अतिशय भयंकर असणार आहेत.

“सनस्पॉट एआर 2770′ असे या सनस्पॉटचे नाव आहे. या सनस्पॉटमुळे पृथ्वीवरील सर्व प्रकारची कनेक्‍टिव्हिटी ठप्प होऊ शकते. वीजप्रवाह खंडित होऊ शकतो आणि मोबाइल नेटवर्कही बंद पडू शकते. या सनस्पॉटचा व्यास 50 हजार किलोमीटरपर्यंत वाढल्यास त्याचे रूपांतर सोलर फ्लेअरमध्ये होऊ शकेल. त्यामुळे कदाचित पॉवर ग्रीड, उपग्रह, रेडिओ संचार, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) आदी सर्व नेटवर्क ठप्प होतील, असे सांगितले जात आहे. करोनाच्या जोडीला भूकंप, महापूर, चक्रीवादळे अशी असंख्य संकटे पृथ्वीवर कोसळलीच आहेत. त्यात आता या संकटाची भर पडल्यास मानवजातीवर प्रचंड मोठा आणि दूरगामी परिणाम होऊ शकतो.

आपल्या सौरमंडलाचा ऊर्जास्रोत आहे सूर्य. वस्तुतः त्याचे 25 वे आवर्तन सुरू झाले आहे. नासा या अमेरिकी अंतरिक्ष संशोधन संस्थेनेही याला पुष्टी दिली आहे. या बदलाचे पृथ्वीवर आणि संपूर्ण सौरमंडलावर परिणाम होऊ शकतात. शास्त्रज्ञांनी गेल्या बुधवारी एका पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, सूर्याचे 25 वे आवर्तन म्हणजे सोलर सर्कल सुरू झाले आहे. त्यामुळेच वेगवान सौरवादळे सुरू होऊ शकतात. वस्तुतः गेल्या काही महिन्यांपासून सूर्याची प्रखरता कमी होती. परंतु निकटच्या भविष्यात सूर्यावरील हालचाली अत्यंत गतिमान होणार आहेत, असे शास्त्रज्ञ म्हणाले.

सूर्याच्या पृष्ठभागावर नुकतीच एक कोरोनियल लाट दिसली होती. त्यावरून असा अंदाज बांधण्यात आला आहे, की आगामी काळात मोठी सौरवादळे होऊ शकतात. याखेरीज सूर्यावरील अन्य हालचालीही वाढण्याची शक्‍यता आहे. सूर्याची प्रखरता कमी होत असल्याचे दिसत असतानाच आवर्तन बदलल्यामुळे तो अत्यंत प्रखर ऊर्जा अंतरिक्षात प्रक्षेपित करू शकतो. या सर्व घडामोडींचा पृथ्वीवर मोठा परिणाम होणे शक्‍य आहे, असे शास्त्रज्ञांना वाटते.

यापूर्वी जर्मनीच्या मॅक्‍स प्लॅंक इन्स्टिट्यूटने वेगळाच दावा केला होता. या संस्थेच्या म्हणण्यानुसार, काळाबरोबर तारे आणि ग्रहांमधून निघणारा प्रकाश क्षीण होत जातो. सूर्यही याला अपवाद नाही. त्यामुळे गेल्या 9 हजार वर्षांत सूर्याची प्रखरता कमी झाली आहे. आतापर्यंत याविषयी जेवढा अभ्यास झाला आहे, त्यानुसार प्रारंभापासून आतापर्यंत सूर्याची प्रखरता पाच पटींनी कमी झाली असल्याचे सांगितले जाते. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या आकाशगंगेत असलेल्या सूर्यासारख्या अन्य ताऱ्यांच्या तुलनेत सूर्याची प्रखरता फिकी पडत आहे. परंतु सूर्याची प्रखरता कमी होणे ही आगामी काळात येणाऱ्या संकटाची नांदी तर नव्हती ना, असा विचार आता काही शास्त्रज्ञ करीत आहेत. नव्या सौरचक्राची सुरुवात हेच त्याचे कारण ठरले आहे.

नव्या सौरचक्राची सुरुवात म्हणजेच सूर्याच्या नव्या आवर्तनाची सुरुवात हा केवळ शास्त्रज्ञांच्या दृष्टीनेच नव्हे तर धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्याही कुतूहलाचा विषय ठरला आहे. दर 11 वर्षांनंतर सौरचक्र बदलते. अर्थात, काही वेळा सौरचक्र 14 वर्षेही चालते. ऑक्‍टोबरमध्ये सूर्यावरील डागांमध्ये वाढ होत नाही, हे पाहिल्यानंतर सौरचक्राचा अवधी वाढेल असे गृहित धरले जात होते. परंतु नासासह अन्य अनेक संस्थांच्या मतानुसार सौरचक्र बदलले आहे.

नासा आणि नॅशनल ओशनिक अँड ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार, सौरचक्रामुळे पृथ्वीवरील मानवी जीवनात बदल घडून येऊ शकतात. हे बदल जाणवतीलच असेही नाही; परंतु जवळजवळ सर्वांवरच हा परिणाम होणार आहे. अंतरिक्ष विज्ञान आणि विकासाच्या कार्यक्रमांवर त्याचा परिणाम अधिक होणे स्वाभाविक आहे. अनेक अंतरिक्ष संशोधन संस्था सूर्यावरील हालचालींवर नजर ठेवून त्यांचे विश्‍लेषण करीत असतात. सूर्यावरील काळे डाग, सूर्यावरील स्फोट आणि सौरवादळे या घडामोडी वेगवेगळ्या प्रकारे तपासल्या जातात आणि त्यांचे विश्‍लेषण केले जाते.

परंतु तसे पाहायला गेल्यास नवे सौरचक्र नोव्हेंबर 2019 मध्येच सुरू झाले होते. परंतु सूर्याचे पृथ्वीपासून असलेले अंतर आणि विश्‍लेषणाच्या मर्यादा यामुळे तेथील घडामोडी समजण्यास काही महिन्यांचा कालावधी लागला. सूर्याच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमान 6 हजार अंश सेल्सिअस एवढे असते. ज्या ठिकाणी सूर्याच्या पृष्ठभागावर डाग निर्माण होतो, तेथील तापमान सरासरीपेक्षा 1500 अंश सेल्सिअसने कमी असते, असे मानले जाते.

वस्तुतः सूर्याच्या पृष्ठभागावर जिथे तापमान कमी असते, त्यालाच सूर्यावरील डाग म्हटले जाते. हे डाग काही तासांपासून काही महिन्यांच्या कालावधीपर्यंत टिकतात. सूर्याच्या प्रखर ज्वाळांमुळे जेव्हा या डागांचा लोप होतो तेव्हा बऱ्याचवेळा सूर्यकण अगदी दूरपर्यंत फेकले जातात. शास्त्रज्ञांनी त्यालाच “सनस्पॉट’ असे नाव दिले आहे. हे सूर्यकण संचार उपकरणांवर परिणाम करू शकतात. म्हणूनच संचारक्रांतीच्या या युगात सूर्यावरील घडामोडींवर नजर ठेवणे हे शास्त्रज्ञांचे कामच होऊन बसले आहे.

गेल्या तीन सौरचक्रांचा अभ्यास केल्यास सूर्याची प्रखरता पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे मानले जाते. परंतु नुकतीच सूर्याच्या पृष्ठभागावर काही सौरवादळे दिसली होती. त्यावरून शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की, सूर्यावर आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर सौरवादळे येऊ शकतात. या घडामोडींमुळे प्रखर प्रकाश, प्रचंड ऊर्जा आणि सौरतत्त्व अंतरिक्षात पसरले जाण्याची शक्‍यता आहे. या घटनांचा थेट परिणाम पृथ्वीवर आणि ब्रह्मांडावर नेमका काय होईल, याचा अभ्यास अद्याप शास्त्रज्ञ करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.