मुलगा, जावई आणि नातू गुंतल्याचा आरोप
बंगलुरू – कर्नाटकात 662 कोटी रूपयांच्या बांधकाम प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाला असून यात येडियुरप्पा यांच्याच घरातील काहीं जण थेट गुंतले आहेत असा आरोप केला जात आहेत.
त्या संबंधात काहीं वृत्तपत्रांमध्ये पुराव्यानिशी बातम्या आल्याअसून या प्रकरणात येडियुरप्पा यांनी त्वरित राजीनामा द्यावा किंवा त्यांनी तो न दिल्यास केंद्र सरकारने त्यांना बरखास्त करावे अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केली आहे.
कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात मोदी किंवा शहा यांनी येडियुरप्पांकडे डोळेझाक कशी केली आणि त्यांनी या प्रकरणात मौन का बाळगले आहे असा सवाल केला आहे.
येडियुरप्पा यांचा मुलगा, जावई आणि त्यांचा नातू या भ्रष्टाचार प्रकरणात थेट गुंतले असल्याचा आरोप या संबंधात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधून करण्यात आला आहे असे सिंघवी यांनी निदर्शनाला आणून दिले. बंगलुरू डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या अंतर्गत हा बांधकाम प्रकल्प असून त्यात येडियुरप्पांचे कुटुंबिय सहभागी असल्याचे पुरावेही उपलब्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि मनिलॉड्रिंग कायद्या अंतर्गत गुन्हे नोंदवून संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणीही सिंघवी यांनी केली आहे. या सगळ्या प्रकरणाची सुप्रिम कोर्ट किंवा हायकोर्टाच्या विद्यमान न्यायाधिशांकरवी दोन महिन्यांच्या आत चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.