अंकारा, (तुर्कीये) – मंगळवारी वायव्य तुर्कीमधील एका स्की रिसॉर्टमधील हॉटेलमध्ये आग लागली, ज्यात किमान ६६ जणांचा मृत्यू झाला आणि ५१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बोलू प्रांतातील कार्तलकाया या रिसॉर्टमधील हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये रात्री आग लागली, असे गृहमंत्री अली येरलिकाया यांनी सांगितले.
अचानक लागलेल्या आगीला घाबरून इमारतीतून उडी मारल्याने दोघांचा मृत्यू झाला, असे गव्हर्नर अब्दुलअझीझ आयदिन यांनी सरकारी अनाडोलू एजन्सीला सांगितले. तर काही लोकांनी चादरी वापरून त्यांच्या खोल्यांमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला, असे खाजगी वृत्तवाहिनीने सांगितले. हॉटेलमध्ये २३४ पाहुणे थांबले होते, असे आयदिन म्हणाले.
आग लागली तेंव्हा रात्र होती, त्यावेळी अनेकजण झोपले होते. आग लागल्याचे समजताच बहुतेक जण हॉटेलबाहेर पळाले. काही जणांनी हॉटेलमधील इतर व्यक्तींना बाहेर काढण्यासही मदत केली. हॉटेल धुराने वेढले गेले होते, त्यामुळे पाहुण्यांना आगीपासून बचाव करण्याचे ठिकाण शोधणे कठीण झाले होते, असे स्थानिक स्की इन्स्ट्रक्टरनी सांगितले.
दूरचित्रवाणीवरील व्हिडीओमध्ये हॉटेलच्या छताला आणि वरच्या मजल्यांना आग लागल्याचे दिसून आले. आगीचे कारण लगेच कळू शकले नाही. हॉटेलच्या बाहेरील बाजूस असलेल्या लाकडी आवरणामुळे आग वेगाने पसरली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
इस्तंबूलच्या पूर्वेला सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोरोग्लू पर्वतांमध्ये कार्तलकाया हे एक लोकप्रिय स्की रिसॉर्ट आहे.
शाळांना असलेल्या सुट्टीच्या वेळी ही आग लागली त्यामुळे या प्रदेशातील हॉटेल्स गर्दीने भरलेली होती. घटनास्थळी 0 अग्निशमन गाड्या आणि २८ रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या . तसेच खबरदारी म्हणून रिसॉर्टमधील इतर हॉटेल्स रिकामी करण्यात आली.