जिल्ह्यात 6,500 पोलिसांची गस्त

पुणे – विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तात तब्बल साडेसहा हजार पोलीस कर्मचारी असणार आहेत. आतापर्यंत तीन हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय सशस्त्र दलाच्या 9 कंपन्या बंदोबस्तासाठी असणार आहेत. 90 पोलिंग बुथ संवेदनशील असून त्यातील 53 अतिसंवेदनशील केंद्रे आहेत. 682 गुन्हेगारांवर तडिपारीची कारवाई करण्यात आली असून, 5 मोका अंतर्गत करवाई करण्याबाबतचे प्रस्ताव होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच 8 पिस्तूल, 15 काडतुसे, 4 तलवारी जप्त करण्यात आले आहे. 3 हजार 993 जणांनी स्वसरक्षणासाठी शस्त्र परवाने घेतली असून त्यापैकी 3 हजार 635 जणांकडून शस्त्र जमा करून घेतली आहेत. 24 परवाने अद्यापही प्रलंबित आहेत.
8,233 पोलीस करणार मतदान
निवडणुकीदरम्यान बंदोबस्तासाठी तैनात 8 हजार 233 पोलिसांपैकी सर्वच पोलीस मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. त्यामध्ये पोस्टल 6 हजार 459 आणि प्रत्यक्षात 1 हजार 774 जण मतदान करणर आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.