ब्रुसेल्स (बेल्जियम) – पाकिस्तानचे सुमारे 6,500 दहशतवादी अफगणिस्तानमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानातील शांतता, स्थैर्य आणि सुरक्षिततेला तसेच दक्षिण आशियाला मोठा धोका संभवतो आहे, असा अहवाल संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या एका अहवालात म्हटले आहे. हा अहवाल सुरक्षा परिषदेच्या “ऍनालॅटिकल सपोर्ट ऍन्ड सॅन्शन्स मॉनिटरींग टीम’ने तयार केला असून त्यामध्ये तालिबान आणि अन्य संबंधित दहशतवादी संघटनांच्या हालचालींबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
युरोपियन युनियन क्रॉनिकलमध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. तेहरीक ए तालिबान पाकिस्तान, जैश ए मोहंम्मद आणि लष्कर ए तोयबासारख्या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांचे सदस्य पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देऊन अफगाणिस्तानातील कारवायांसाठी सल्लागार म्हणून काम करत आहेत. ते स्थानिक युवकांना अत्याधुनिक स्फोटकांमध्येही प्रशिक्षित करत आहेत. या अन्य दहशतवादी संघटनांच्या कारवायांमुळे तालिबानपुढे दहशतवादविरोधी सहकारी म्हणून आपली विश्वासार्हता सिद्ध करण्याचेच आव्हान उभे राहिले आहे.
त्याशिवाय अफगाणिस्तानबाबतची पाकिस्तानची महत्वाकांक्षा तसेच “आयएसआय’ या गुप्तचर संघटनेकडून पाकिस्तानातील दहशतवादी गटांना होत असलेले सहकार्यही नियंत्रित करण्याची गरज असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या या अहवालात म्हटले आहे.
पाकिस्तानमधील पूर्वीच्या सरकारांनी अमेरिकेला दहशतवादी गटांच्या कारवायांबाबत सत्यस्थिती सांगितली नव्हती. विशेषतः गेल्या 15 वर्षात पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या 40 संघटना दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या होत्या, हे अमेरिकेला सांगितले गेलेले नव्हते, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये केलेल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान कबूल केले होते. अफगाणिस्तान किंवा काश्मीरमध्ये 30 ते 40 हजार प्रशिक्षित सशस्त्र लोक सक्रिय असल्याचे इमरान खान तेंव्हा म्हणाले होते.
पॅरिसमधील “फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स’च्या शिफारसींप्रमाणे दहशतवादी गटांविरोधात पाकिस्तान कृती करत नसल्याचे पुरावे उपलब्ध असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. या शिफारसींची पूर्तता न केल्याबद्दल काळ्या यादीत टाकले जाऊ नये, म्हणून गेल्या काही काळापासून पाकिस्तानची धडपड सुरू आहे.