कुलगुरूंना संसदेचे सभासद होता येणार नाही
नवी दिल्ली, ता. 1 – संसदीय (पात्रता प्रतिबंधक) विधेयकावर आज कलमवार चर्चा होऊन दोन दुरूस्त्या स्वीकारण्यात आल्या. पहिल्या बिनसरकारी दुरूस्तीनुसार विद्यापीठांच्या कुलगुरूंना यापुढे संसदेचे सभासद होता येणार नाही. या विधेयकाने ठरविण्यात येणाऱ्या अपात्रतेबाबतची अंमलबजावणी, सध्याच्या सभासदांबाबत, हे विधेयक अंमलात आल्यापासून सहा महिने लागू करू नये ही श्रीमती सुचेता कृपलानी आणि श्री जगन्नाथ राव यांची सूचनाही सभागृहाने मान्य केली. कायदेमंत्री श्री. एन. के. सेन यांनी ही दुरूस्ती घटनेत बसते असे सांगितले.
धातूंची झाडे
मॉस्को – येथील एका मोठ्या उद्यानांत सर्वसाधारण पाइन व ओकच्या झाडासारखी दिसणारी दोन धातूंची झाडे लावण्यात आली. ही झाडे म्हणजे दोन फवारे होत. पाइन झाडाचे खोड काचेचे असून, फांद्या पितळेच्या व सळ्यासारखी पाने ही टाचण्याची आहेत. टाचण्याची लांबी 9 किलोमीटर भरेल. हे झाड आठ कुशल कारागिरांनी बनविले आहे. ओक झाडाचे खोड शिशाचे बनविले आहे तर पाने तांब्याची असून त्याला 5200 फांद्या आहेत. पाण्याच्या तुषारांनी व्यापलेल्या या झाडाकडे पाहून प्रेक्षकांना ती धातूंची आहेत, याची लगेच कल्पनाही येत नाही.
जमीनदारांनी ग्रामदान चळवळीत सामील व्हावे
आचार्य विनोबांचा उपदेश
राजकोट – जमीन सुधारणेमुळे जे प्रश्न निर्माण झाले आहेत ते सोडविण्यासाठी आपल्या ग्रामदान चळवळीत सहभागी व्हावे, असा आचार्य विनोबा यांनी जमीनदारांना (कच्छ येथील) उपदेश केला. आचार्य म्हणाले- जमीनदारांनी निष्ठेने या चळवळीत भाग घेतला तर जमीनसुधारणेमुळे गेलेल्या त्यांच्या जमिनींपैकी खेडूत काही जमिनी स्वखुशीने जमीनदारांना परत करतील.