पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. सध्या 65 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यातील सुमारे 50 टक्के विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरले आहेत, अशी माहिती अकरावी प्रवेश समितीकडून देण्यात आली.
न्यायालयाने अकरावी सीईटी रद्द केल्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागातर्फे अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. पुणे- पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील 308 कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे प्रवेशासाठी 1 लाख 10 हजार 55 जागा उपलब्ध झाल्या आहेत. कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेसाठी नेमक्या किती जागा उपलब्ध आहेत, याची सविस्तर माहिती येत्या दोन दिवसात प्रसिद्ध होणार आहे.
इयत्ता दहावीच्या निकालात वाढ झाल्यामुळे अकरावी प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुध्दा वाढणार आहे. मागील वर्षी अकरावी प्रवेशासाठी 1 लाख 7 हजार जागा उपलब्ध होत्या. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत अकरावी प्रवेशासाठी नोंदणी करणा-या कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या वाढल्याने प्रवेशाच्या एकूण जागांमध्ये सुमारे तीन हजाराने वाढ झाली आहे. परिणामी दहावी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अकरावीत प्रवेश मिळण्याची चिन्हे आहेत.