नवी दिल्ली/लखनौ : दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या तबलिगी जमातच्या मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या 647 जणांची कोरोना चाचणी गेल्या दोन दिवसांत पॉझिटिव्ह आल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. हे बाधीत देशाच्या 14 राज्यांत आढळले आहे. गेल्या 24 तासांत मरण पावलेल्या 12 मृतांपैकी काही जण तबलिगीशी संबंधीत आहेत. दरम्यान, या मेळाव्यात सहभागी झालेल्या काही जणांना गझियाबाद येथे विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. मात्र त्यांनी परिचारिकांशी अश्लील वर्तन केले. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश आदित्यनाथ सरकारने दिले आहेत.
केंद्र सरकारने या मेळाव्यात सहभागी झालेल्या 360 परदेशी नागरिकांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर 960 जणंना काळ्या यादीत टाकण्याचे संकेत केंद्राने दिले. दरम्यान, आरोग्य कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन करणाऱ्या आणि शिविगाळ करणाऱ्या या धार्मिक गटावर कठोर कारवाई करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. गझीयाबाद येथे गैरवर्तन करणाऱ्या सहा तबलिगींवर रासुकाखाली कारवाई करण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिले.
कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने या बाधितांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला सहकार्य न करणारे हे आरोपी मानवतेचे शत्रू आहेत, अशी संभावना योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. निजामुद्दीनमध्ये झालेल्या या मेळाव्याशी संबंधित 647 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
14 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील लोकांचा यात सहभाग आहे. त्यात अंदमान आणि निकोबार बेट, आसाम, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मिर, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील लोकांचा त्यात समावेश आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
तबलिगी जमातीच्या सहा मजली मुख्यालयात झालेल्या या मेळाव्याने देशभरात चिंतेची लाट पसरली. त्यात सहभागी झालेल्यांचा शोध घेण्याचे आव्हान राज्य सरकारपुढे उभे राहिले. देशात 2301 जण कोरोनाबाधित असून त्यात गुरूवारपासून 336 जणांची भर पाडली आहे. कोरोनाची बाधा झाली असणारी शक्यता व्यक्त करणारे आरोग्य सेतू ऍप 30 लाख लोकांनी डाऊन लोड केले आहे, असे सांगून केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल म्हणाले, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनीही आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतूक केले पाहीजे. याच पत्रकार परिषदेत, केंद्रीय गृह खात्याच्या सहसचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी यावर राज्यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.