प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 -महापालिका आयुक्तांनी आदेश देऊनही गेल्या तीन वर्षांत काम केलेल्या डांबरी रस्त्यांची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिकेच्या 15 मधील 9 क्षेत्रीय कार्यालयांनी दोष दायित्व कालावधी असलेल्या 640 रस्त्यांची माहिती अखेर सादर केली आहे. तर सहा क्षेत्रीय कार्यालयांना अद्याप रस्तेच सापडत नसल्याचे या अहवालावरून दिसून येत आहे.
यंदाच्या पावसात शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची संख्या प्रचंड असल्याने पुणेकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
त्यानंतर अखेर जाग आलेल्या पालिका प्रशासनाने गेल्या तीन वर्षांत केलेल्या रस्त्यांच्या 139 कामांची तपासणी करून ठेकेदारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याच वेळी शहरातील 12 मीटरच्या आतील क्षेत्रीय कार्यालयांकडून डांबरीकरण केल्या जाणाऱ्या रस्त्यांचीही प्रचंड दुरवस्था झालेली आहे.
त्यामुळे अशा रस्त्याची तातडीने माहिती देण्याचे आदेश महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले होते. मात्र, शनिवारपर्यंत एकाही क्षेत्रीय कार्यालयाने ही माहिती दिलेली नव्हती. त्यानंतर माहिती न दिल्यास कडक कारवाईचा इशारा अतिरिक्त आयुक्तांनी दिला होता. अखेर खडबडून जागे झालेल्या 15 मधील 9 क्षेत्रीय कार्यालयांनी अशा 640 रस्त्यांची माहिती कळविली असून, अद्यापही 6 क्षेत्रीय कार्यालये आपण केलेल्या कामांची माहितीच शोधत असल्याचे चित्र आहे.
क्षेत्रीय कार्यालयानुसार रस्ते
औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील 93 रस्ते, शिवाजीनगर-घोले रस्ता कार्यालय 11, कोथरूड-बावधन 81, वारजे-कर्वेनगर 150, हडपसर-मुंढवा 58, वानवडी-रामटेकडी कार्यालय 68, कोंढवा-येवलेवाडी कार्यालय 110, कसबा- विश्रामबाग 51, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने 18 अशा एकूण 640 रस्त्यांची माहिती दिली आहे.