पुणे- शहरात बुधवारी नव्या करोना बाधितांची संख्या पुन्हा दोन हजारपार गेली आहे. तर जवळपास तेवढ्याच संख्येने बाधित करोनामुक्त झाले आहेत. मात्र, मृत्यूचा कहर कायम असून, गेल्या 24 तासांत 64 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहर-41 तर ग्रामीण आणि अन्य जिल्ह्यांतील 23 जणांचा समावेश आहे.
सोमवारी चाचण्यांची संख्या कमी झाल्यामुळे मंगळवारी बाधितांची संख्याही दोनशेने कमी झाली होती. मात्र, बुधवारी चाचण्यांची संख्या सर्वाधिक झाली असून, दिवसभरात 7 हजार 690 संशयिताची तपासणी करण्यात आली.
दरम्यान, शहरात आतापर्यंत करोनामुळे 2 हजार 625 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 92 हजार 614 बाधित करोनामुक्त झाले आहेत.
शहरात सध्या 16 हजार 677 बाधित सक्रिय असून, त्यातील 927 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील 483 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे, तर 444 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.