महाबळेश्‍वरमध्ये 64.72 टक्के मतदान

महाबळेश्‍वर – लोकसभा पोटनिवडणूक व विधासभेसाठी सोमवारी महाबळेश्‍वर तालुक्‍यात 128 मतदान केंद्रावर दिवसअखेर शांततापूर्ण वातावरणात 64.72 टक्‍के मतदान झाले. ग्रामीण भागात काही गावांना इव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्याने काही काळ मतदानात अडथळा निर्माण झाला होता. तहसिलदार कार्यालयावतीने तातडीने नादुरूस्त मशीन बदलण्यात आल्या व तेथे पुन्हा जोमाने मतदान सुरू झाले.

वाई, खंडाळा व महाबळेश्‍वर या तीन तालुक्‍यांचा समावेश असलेल्या या मतदार संघात महाबळेश्‍वर तालुक्‍याची सर्वात कमी मतदार संख्या आहे. महाबळेश्‍वर येथे 28,083 पुरूष तर 28,076 स्त्री मतदार असे एकूण 56,159 मतदार संख्या आहे. यापैकी आज शहरी व ग्रामीण असे एकून 64.72 टक्‍के मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावला. सकाळी सात वाजता मतदान सुरू झाले. सकाळी मतदानाचे प्रमाण कमी होते, 11 नंतर मतदानाने वेग पकडला. दिवसभर पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने मतदारांमध्ये चांगला उत्साह दिसून आला.

लोकसभेसाठी पाचगणी, पांगारी आणि तायघाट येथे व्हीव्हीपॅट मशिन नादुरूस्त झाले तर साळोशी येथे व्हीव्हीपॅट व इव्हीएम मशीन बंद पडले तर विधानसभेसाठी पांचगणी महाबळेश्‍वर रूळे या तीन ठिकाणी मतदारसाठी वापरण्यात येणारे सर्व मशिन बंद पडल्याच्या घटना घडल्या. या सर्व ठिकाणी मतदान काही काळ बंद पडले होते. याबाबत केंद्र प्रमुखांनी महाबळेश्‍वर तहसील कार्यालयात माहिती दिली. तहसिलदार कार्यालयाच्यावतीने तातडीने आवश्‍यक तेथे मशीन बदलण्यात आल्या. क्षेत्र महाबळेश्‍वर येथे 97 वर्षाच्या वृध्दा भिमाबाई राघु कात्रट यांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावला.

Leave A Reply

Your email address will not be published.