इटलीमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक
चीनमध्ये मृत्यूच्या प्रमाणात घट
नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूने घातलेला थैमान काही केल्या थांबत नाही. मागील 24 तासांमध्ये संपूर्ण जगात वेगवेगळ्या देशांमध्ये 638 लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व देशांमध्ये इटलीमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. इटलीमध्ये मागील 24 तासांमध्ये 349 लोकांचा मृत्यू झाला आहे. पण चीनमध्ये मात्र मृत्यूच्या प्रमाणात घट होत आहे. काल चीनमध्ये कोरोनामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला होता. तर आज 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीन आणि इटलीनंतर कोरोनाचा सर्वाधिक परिणाम इराणवर झाला आहे. इराणमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 129 लोकांचा मृत्यू झाला आहे.
चीन, इटली, इराण, स्पेन आणि फ्रान्स या देशांमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त मागील 24 तासांमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनी यांसारख्या देशांचाही समावेश आहे. अमेरिकेमध्ये 19, ब्रिटनमध्ये 20 आणि जर्मनीमध्ये 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त जपान, स्वीडन, कॅनडा, इजिप्त आणि पोर्तुगालसह 21 देशांमधील लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जगभरात आतापर्यंत कोरोनामुळे जवळपास 7158 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या घातक विषाणूमुळे 1 लाख 82 हजारपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. या विषाणूची लागण झाल्यानंतर त्यातून जवळपास 79 हाजारांहून अधिक जण बरे झाले आहेत. आता जगभरात जवळपास एक लाखांहून कोरोनाग्रस्त आहेत. यांपैकी 6 हजारांहून अधिक लोकांची प्रकृती चिंताजनक आहे.