मुंबई – पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्येची आज ईडीकडून सुमारे साडे सहातास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यावर एकनाथ खडसे यांनी ईडीला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे तसेच ईडीला जी कागदपत्रे लागतील ती देणार असल्याचे सांगितले.
एकनाथ खडसे यांना ईडीने 30 डिसेंबरला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजाविले होते. पण त्याच काळात करोनाची लक्षणे दिसल्याने एकनाथ खडसे क्वारेंटाइन झाले होते. त्यामुळे खडसे यांना 14 दिवसांनंतर चौकशीस बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 15 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स ईडीने बजाविले. त्यानुसार आज सकाळी एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आज सकाळीच ईडीच्या कार्यालयात गेले. यावेळी त्यांची साडे सहातास कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांच्या कन्येचीही चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारे खडसे ईडी कार्यालयातून बाहेर पडले.
यानंतर पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले, ईडीने नोटीस बजावली होती. त्यामुळे मी हजर राहिलो. यापूर्वी दोनवेळा भोसरी जमीन प्रकरणी चार वेळा चौकशी झाली आहे. आता ईडीकडून पाचव्यांदा चौकशी केली जात आहे. अँटिकरप्शन ब्युर, आयकर विभाग आणि जोटिगं कमिटीने सखोल चौकशी केली आहे. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत, असे सांगतानाच ईडीकडून आपल्यावर कोणताही दबाव आलेला नाही. त्यांनी पुन्हा बोलावलेलेही नाही, असे खडसे म्हणाले.