उजनीतील 63 टीएमसी पाण्याची नासाडी

पिके करपू लागल्याने शेतकरी चिंतेत ः शासनाने योग्य नियोजन करण्याची गरज

अकलूज-“नदीला पूर, मात्र नदीकाठावर दुष्काळ’ अशी विचित्र परिस्थिती सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही त्याच्या विसर्गाचे योग्य नियोजन न केल्याने उजनी धरणातून 63 टीएमसी पाणी अक्षरशः वाया गेल्यातच जमा आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये 63 टीएमसी पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे. उजनी धरण भरल्यानंतर अतिरिक्‍त झालेले सर्व पाणी फक्‍त भीमा नदीतच न सोडता पूर्वनियोजनाद्वारे हे पाणी कालव्यात सोडून जिल्ह्यातील उपनद्या, ओढे-नाले, बंधारे, गावतळी, शेततळी, तलाव भरून घेतली असती तर दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकचा दिलासा मिळाला असता.

एकीकडे जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा नदीला महापूर आला आहे आणि याच नदी तीरावरील गावांमध्ये पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी नाही, अशी विचित्र परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. भीमेचे पाणी कर्नाटकात गेल्या पंधरा दिवसांमध्ये उजनीतून वाहून गेले. वाया घालविलेल्या या पाण्यातून पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील उपनद्या, ओढे-नाले, बंधारे, गावतळी, शेततळी, तलाव भरून घेणे गरजेचे होते; मात्र वेळीच नियोजन न केल्याने हक्‍काचे पाणी डोळ्यांसमोरून वाहून गेले.

 • पावसाळ्यातही 375 टॅंकर सुरू
  उजनी धरण 100 टक्के भरल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटला असला तरी, जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने उभी पिके करपू लागली आहेत. ऐन पावसाळ्यात ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे टॅंकर आणि जनावरांच्या छावण्या पुन्हा सुरू करण्याची मागणी वाढते आहे. पावसाळा निम्म्सययावर आला असताना जिल्ह्यात 265 छावण्या आणि
 • 375 पाण्याचे टॅंकर सुरू आहेत.
  चौकट ः 249 टीएमसी पाणी उजनी धरणात दाखल
  गेल्यावर्षी पाणी वाटपाचे नियोजन काटेकोरपणे न झाल्याने उजनी धरणाची पातळी उणे 59 टक्‍क्‍यांवर पोचली होती. सुदैवाने पुणे जिल्ह्यात भरपूर पाऊस पडल्याने तळाला गेलेले धरण काठोकाठ भरून वाहू लागले आहे. गेल्या पंधरा दिवसांत भीमा खोऱ्यातील 19 धरणांमधून 249 टीएमसी पाणी उजनी धरणात दाखल झाले होते. त्यापैकी अतिरिक्‍त झालेले 63 टीएमसी पाणी भीमा नदीत सोडण्यात आले.
 • नदीत सोडण्यापेक्षा शेतकऱ्यांना पाणी द्या
  आजही उजनीतून हजारो क्‍युसेक पाणी भीमा नदीत सोडून दिले जात आहे. हे पाणी कालव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायला हवे. जिल्ह्यात यावर्षी फक्‍त 110 मिलीमीटर पाऊस झाला आहे. अक्‍कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यात याहून कमी आहे. जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता पाटबंधारे विभागाने पाण्याचे नियोजन काळजीपूर्वक करणे आवश्‍यक आहे. शासनाने पाण्याचे वेळीच नियोजन न झाल्यास आगामी वर्षात तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागण्याची भीती आहे.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×