पुणे शहरात झाल्या अवघ्या 63 कोपरा सभा

सर्वच पक्षांचे 100 ते 150 कोपरासभांचे होते नियोजन

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणे शक्‍य नसल्याने, तसेच शहरातील सभांच्या जागांची उपलब्धता लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी प्रत्येकी 100 ते 150 कोपरासभा घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, प्रचार संपण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असतानाच, शहरात अवघ्या 63 कोपरा सभा झाल्याचे समोर आले आहे. सभेसाठीच्या परवानग्या तसेच आकारले जाणारे शुल्क हे मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच वाढत्या उन्हाच्या चटक्‍यामुळे बहुतांश पक्षांनी या सभांना फाटा देत बंद सभागृहात मेळावे घेण्यावरच भर दिल्याने या सभांची संख्या घटल्याचे समोर आले आहे.

शहरातील मतदारांची संख्या सुमारे 20 लाखांच्या वर आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांपर्यंत पोहचणे शक्‍य नसल्याने भाजप, कॉंग्रेस तसेच इतर पक्षांकडून कोपरासभांचे नियोजन केले होते. भाजपने आपल्या सर्व आमदारांच्या मतदारासंघात प्रत्येकाने प्रत्येकी 10 ते 15 सभा घ्यावात असे निश्‍चित केले होते. तर कॉंग्रेसनेही 100 हून अधिक सभांचे नियोजन केले होते. मात्र, प्रत्यक्षात प्रचार सुरू झाल्यानंतर गेल्या दहा ते 12 दिवसांत अवघ्या 63 कोपरासभांसाठी परवानगी घेण्यात आली आहे. त्यामुळे जेवढे नियोजन करण्यात आले होते. तेवढ्या सभा कोणत्याही राजकीय पक्षाला घेता आल्या नसल्याचे समोर आले आहे. या सभांसाठी महापालिकेकडून प्रत्येकी 7,500 रुपयांचे शुल्क निश्‍चित केले होते. तसेच, परवानगीसाठी मोठ्या प्रमाणात सोपस्कर पार पाडावे लागत होते. त्यामुळे राजकीय पक्षांकडून कोपरासभांपेक्षा मेळावे घेण्यावरच भर दिला जात असून वेगवेगळ्या जातींचे, व्यावसायिकांचे तसेच समाजांसह, वेगवेगळ्या घटकांचे मेळावे, घेत प्रचाराचे सोपस्कर पार पाडले जात आहेत.

एलईडी व्हॅनचा आधार
सर्वच राजकीय पक्षांना कोपरासभांचे नियोजन कोलमडल्यानंतर एलईडी व्हॅनने आधार दिला आहे. डीजीटल स्क्रीन लावण्यात आलेल्या या व्हॅन शहरात कोठेही गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा प्रकारे लावण्यात येत असून त्यावर उमेदवार तसेच पक्षाची जाहिरात केली जात आहे. त्यामुळे एकाचवेळी सभा न बोलविताही उमेदवारांना चित्रफितीद्वारे मतदारांशी संवाद साधणे शक्‍य होत असल्याचे राजकीय पक्षांकडून सांगण्यात येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)