62 वर्षापूर्वीं प्रभात : कर्मवीर भाऊराव पाटील यांना पद्मभूषण पदवी

ता. 26, माहे जानेवारी, सन 1959

नवभारताचे स्वप्न साकारण्यासाठी अधिक स्वार्थत्यागाची जरुरी ; प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतींची नभोवाणी 

नवी दिल्ली, ता. 25 – ज्या नवभारताच्या उभारणीचे स्वप्न आपण उराशी बाळगले आहे ते साकार करण्यासाठी अधिक स्वार्थत्यागास सिद्ध रहा, असा संदेश राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी आज रात्री भारतीय जनतेला दिला. उद्याच्या 9व्या प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती नभोवाणीवर बोलत होते.

राष्ट्रपती म्हणाले, सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती स्वार्थत्याग करण्याची वृत्ती. भावी सुखासाठी आता स्वच्छेने कष्ट करण्याची तयारी! स्वातंत्र्य पूर्वकाळातच साधेपणाने राहण्याची, स्वार्थत्यागाची जरुरी होती असे मानणे चुकीचे आहे. स्वतंत्र राष्ट्राचे उत्कर्षासाठी, नवउभारणीसाठीही तोच त्याग, कष्ट जरुरी आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांना पद्मभूषण पदवी 

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपतींनी केलेल्या पदवीदानात महाराष्ट्राचे कर्मवीर भाऊराव पाटील यांना पद्मभूषण पदवी देण्यात आली. मराठी नाटककार मामा वरेरकर यांनाही पद्मभूषण पदवी मिळाली.

माणसाचा दर्जा पैशावर ठरविणे निषेधार्ह – पंडितजी 

नवी दिल्ली – माणसाचा सामाजिक दर्जा पैशावर ठरविणे निषेधार्ह आहे, असे पंतप्रधान पं. नेहरू म्हणाले. प्राथमिक व दुय्यम शिक्षकांना आज गुणवत्तेबद्दल राष्ट्रीय पारितोषिके देण्याचा समारंभ झाला. या प्रसंगी बोलताना पंडितजी म्हणाले, शाळा मास्तरला कमी पगार असतो हे खरे पण म्हणून त्यांचा दर्जा कमी समजू नये. जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे हे खरे पण माणसाचा सामाजिक दर्जा पैशावर मानला जावा याचे आश्‍चर्य वाटते.

खोटी आशा न बाळगता धेय्य-मार्गक्रमण चालूद्या- ना. चव्हाण यांचा संदेश 

मुंबई – प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राज्यातील जनतेला पुढील संदेश दिला आहे- “एका प्रजासत्ताक दिनामागून दुसरा प्रजासत्ताक दिन जात आहे, अशावेळी आपल्यापुढे असलेल्या प्रचंड कार्याची मनाला जाणीव होते आणि आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेतला जातो. कल्याणकारी राज्याचे आपले ध्येय एका दिवसात गाठणे शक्‍य नाही. पण आपण जे साध्य केले त्यामुळे आपल्या मनात खोट्या आशा निर्माण होऊ न देऊन आपण स्वस्थ बसता काम नये.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.