पिंपरी-चिंचवड शहरात करोनामुक्‍त 62 हजार; प्लाझ्मादाते केवळ 805

पिंपरी – अत्यवस्थ करोना रुग्णांवर हमखास उपचार म्हणून ज्या प्लाझ्माचा उपयोग होत आहे. त्यासाठीचे दाते पुढे येण्यास धजावत नसल्याचेच विदारक चित्र शहरात आहे. शहरातील तब्बल 62 हजार 618 जण करोनामुक्त झाले असले तरी आतापर्यंत केवळ 805 जणांनी प्लाझ्मादान केल्याचे आकडेवारीवरून पुढे आहे. त्यामुळे करोनामुक्त रुग्णांनी स्वत: पुढाकार घेऊन प्लाझ्मादान करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ज्यांची रोग प्रतिकारकशक्ती चांगली आहे त्यांना करोनामुळे कमी धोका असला तरी इतर आजार असलेल्या अथवा साठपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना करोनाचा धोका मोठा आहे. प्रारंभिक अवस्थेमध्ये करोनाच्या रुग्णांवर सर्व प्रकारचे उपचार केले जातात. इंजेक्‍शन, गोळ्यांच्या माध्यमातून रुग्ण बरा करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी काही रुग्ण मात्र या उपचार पद्धतीनंतरही अत्यवस्थ होत असल्याचे चित्र आहे. या रुग्णांवर हमखास उपचार पद्धती म्हणून प्लाझ्मा थेअरपीचा वापर केला जातो. आजपर्यंत ज्यांच्यावर प्लाझ्माचा वापर झाला त्यातील बहुतांश रुग्ण हे ठणठणीत बरे झाले आहेत.

करोनातून मुक्त झालेला कोणताही व्यक्ती 28 दिवसांनंतर प्लाझ्मा दान करू शकतो, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसह सामाजिक संस्थांनी केल्यानंतरही त्याचा फारसा उपयोग झाल्याचे चित्र दिसून येत नाही. करोनामुक्त झालेल्या व्यक्तीने प्लाझ्मा आणि रक्तदान केल्यास त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे करोनामुक्त झालेल्या प्रत्येकाने प्लाझ्मादानासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरातील 76 हजार 69 जणांना आतापर्यंत करोनाची बाधा झाली आहे तर त्यापैकी 62 हजार 718 जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. यातील केवळ 805 जणांनीच प्लाझ्माचे दान केले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी करोनामुक्त झालेल्यांनी स्वत:हून प्लाझ्मादानासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

1010 रुग्णांवर प्लाझ्माचा वापर
शहरातील करोनामुक्त झालेल्या 805 नागरिकांनी आतापर्यंत प्लाझ्मादान केले असून, त्यापैकी 405 जणांनी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात केले आहे. तर 400 जणांनी बाहेरील रक्तपेढ्यांमध्ये प्लाझ्मादान केले आहे. 805 प्लाझ्मादात्यांपासून 1030 प्लाझ्माच्या बॅगची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातील 1010 बॅग रुग्णांवर उपचार करण्यासाठी वितरीत करण्यात करून रुग्णांसाठी वापर करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.