61 वर्षांपूर्वी प्रभात : ता. 13, माहे एप्रिल, सन 1960

शेतकरी संघटित झाले तर महाराष्ट्राचे रूप बदलता येईल

– ना. यशवंतराव चव्हाण

सोलापूर, ता. 12 – आजवर राजकारणी लोक शेतकऱ्यांना आपले एक हत्यार म्हणून वापरीत होते पण आता शेतकरी जागे होऊन स्वहिताचे दृष्टीने संघटित होत आहेत, असे ना. यशवंतराव चव्हाण यांनी शेतकरी मेळाव्यात बोलताना सांगितले. महाराष्ट्रात सुधारलेल्या पद्धतीने लागवड करण्याचा जो प्रश्‍न आहे तो त्वरेने सोडवता येईल असा विश्‍वास व्यक्‍त करून ते म्हणाले, पाट-बंधाऱ्यांचे योजनांचा लाभ घेऊन काही प्रमाणात उत्पादनवाढ करता येईल.

कारण येथे मान्सून पावसावरच अवलंबून राहावे लागते. चव्हाण म्हणाले, शेतकरी संघटित झाले तर महाराष्ट्राचे रूप बदलून टाकता येईल आणि यामुळे अखिल भारताचेही रूप बदलून टाकण्याचे योजनेस हातभार लागेल. शेतकरी आपली परिस्थिती बदलून टाकतील. शिस्तीचे वागणुकीबद्दल चव्हाणांनी शेतकरी मंडळींना धन्यवाद दिले. या मेळ्यावास सुमारे दीड लाख शेतकरी हजर होते.

कोंकण रेल्वेसाठी दोन मार्गांची पाहणी झाली
मुंबई – कोंकण रेल्वेच्या पहिल्या टप्प्यासाठी दोन वेगवेगळ्या मार्गांची पाहणी करण्यात आली असून रेल्वे बोर्ड त्यातील कोणता मार्ग हाती घ्यावयाचा याबद्दल निर्णय घेईल अशी माहिती मध्य रेल्वेचे मॅनेजर डी. आर. खन्ना यांनी दिली. ते म्हणाले, कोंकण रेल्वेसाठी कल्याण ते पनवेल व दिवा ते पनवेल या दोन मार्गाची पाहणी करण्यात आली. 1 ऑक्‍टोबरपासून अलाहाबादमार्गे मुंबई ते कलकत्ता जनता गाडी सुरू करण्यात येईल.

खंबायत भागांत भरपूर तेल
अहमदाबाद – खंबायत भागांत 4 कोटी टन तेल असावे असे रशियाचे खनिज आणि भूस्तर संशोधन खात्याचे मंत्री अँत्रापॉव्ह यांनी गेल्या आठवड्यात खंबायत भागास भेट दिली. येथील तेल कुवेत आणि इराणच्या आखातातील तेलाच्या दर्जाचे असावे. तेल उद्योगाचा विकास करून भारताला तेलाबाबत स्वयंपूर्णता गाठता येईल. खंबायत भोवतीच्या 30 चौरस एकराची हवाई पाहणी केली जाईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.