नवी दिल्ली, ता. 21 – अणुशक्तीचा शांतता कालीन कामासाठी उपयोग करण्याबाबत रशियाचे सहकार्य मिळविण्याच्या प्रश्नाची चर्चा करून करार करण्यासाठी भारतीय शिष्टमंडळ लवकरच रशियाला जाणार असे परराष्ट्र खात्याच्या उपमंत्री लक्ष्मी मेनन यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी सांगितले. नेहरू यांनी याबाबत आणखी उत्तर देताना सांगितले की, अणुशक्ती मंडळाचे अध्यक्ष होमी भाभा हे रशियाला जाण्याची शक्यता आहे. लहान आकाराची अणुशक्तीची बरीच वीज केंद्रे उभारण्याचा सरकारचा विचार आहे.
बेकारीच्या प्रश्नावर अधिक भर दिला पाहिजे
नवी दिल्ली – तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत बेकारीच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष द्यावे आणि अपत्य नियोजनाचा प्रचार करावा असे अंदाज समितीने आपल्या 88व्या अहवालात म्हटले आहे. जिल्हा व गावाच्या पातळीवर अधिक रोजगार शोधण्याच्या कामगार मंत्र्यांच्या योजनेला अधिक चालना द्यावी असे समितीला वाटते.
अंतराळात मानवाआधी कृत्रिम मानव पाठविणार
मॉस्को – मानवाला चंद्र आणि इतर अंतराळ गोलावर जाणे आता अगदी शक्य कोटीतील असले तरी प्रत्यक्ष मानव अंतराळ-प्रवासाला निघण्यापूर्वी यांत्रिक मेंदू असलेला कृत्रिम मानवच अंतराळात पाठवून त्याच्यामार्फेत अंतराळात चंद्रावर निरीक्षण करावे लागेल असे बोरिस दानिलिन या शास्त्रज्ञाने म्हटले आहे. यांत्रिक-मेंदू मानवी मेंदूहून अतिशय भिन्न प्रकारचा असला तरी मानवी मेंदूची बरीच कार्ये करू शकेल. असा यांत्रिक मेंदू असलेला कृत्रिम मानव आज तयार करणे अगदी शक्य आहे. यांत्रिक मेंदू असलेला हा कृत्रिम मानव अंतराळात जाणाऱ्या रॉकेटचे संचालन करू शकेल व इष्ट स्थळी ते रॉकेट नेऊन पोहोचवू शकेल.
गंगा-ब्रह्मपुत्रेच्या पाण्याचा शेतीस वापर
नवी दिल्ली – गंगा-ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील पाण्याचा फक्त 25 टक्के इतकाच उपयोग करून घेण्यात येतो असे राष्ट्रसंघ अन्न-शेतकी संघटनेच्या तज्ज्ञ समितीने आपल्या पाहणी अहवालात म्हटले आहे.