61 वर्षांपूर्वी प्रभात: प्रा. शालांत प्रमाणपत्र परीक्षेत हिंदीची सक्‍ती

पुणे, ता. 7 – प्राथमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षी प्रथमच हिंदी हा सक्‍तीचा विषय घ्यावा लागला आहे. तीन वर्षांपूर्वी शिक्षणखात्याने प्राथमिक शाळांतील 5वी ते 7 वी इयत्तांना “हिंदी’ हा सक्‍तीचा विषय सुरू केला होता. या परीक्षेला हिंदी विषयाची परीक्षा प्रथमच होत असल्याने या विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेविषयी विद्यार्थ्यांत कुतूहल व धास्ती होती. परंतु प्रश्‍नपत्रिका पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्‍त केले.

म्हैसूरचे नाव कर्नाटक ठेवा म्हैसूर असेंब्लीत ठराव तहकूब
बंगलोर – काल म्हैसूर विधिमंडळात महसूलमंत्री काडिदल मंजाप्पा यांनी तहकुबी ठरावाची सूचना मांडली व ती मंजूर झाली. एका खासगी सभासदाने असा ठराव मांडला होता की, “म्हैसूर’ राज्याचे नाव “कर्नाटक’ असे ठेवावे. आता ठरावावरील चर्चा तहकूब झाली असली तरी पुन्हा चर्चा केव्हा करायची त्याची तारीख ठरलेली नाही.

महाराष्ट्र राज्याच्या उत्सवात दिवाळीप्रमाणे पणत्या उजळणार
मुंबई – महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा उत्सव 26 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. काल मुख्यमंत्री ना. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक 30 नागरिकांची उत्सव समिती नेमण्यात आली. तिच्या बैठकीत असे ठरले की, उत्सवाच्या कालावधीत विजेची रोषणाई न करता दिवाळीप्रमाणे घरोघर पणत्या लावाव्यात. इतर कार्यक्रमांत प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, मिरवणुका, मेळावे, गरिबांना अन्नदान यांचा समावेश आहे.

शस्त्रक्रियेसाठी हृदयक्रिया तात्पुरती बंद ठेवण्याचा भारतात यशस्वी प्रयोग
नवी दिल्ली – आज लोकसभेत आरोग्यमंत्री ना. करमरकर यांनी असा खुलासा केला की, हृदयावर शस्त्रक्रिया करण्यासाठी हृदयाचे स्पंदन काही काळपर्यंत थांबविण्याबाबतचे प्रयोग मुंबई वा वेलोर येथील इस्पितळात चालू होते. ते यशस्वी झाले आहेत. कानपूर येथे एका शस्त्रवेत्याने कुत्र्याचे हृदय 27 मिनिटांपर्यंत शस्त्रक्रियेसाठी यशस्वीपणे बंद केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.