रोम, ता. 18 – रोममधील पदार्थ विज्ञान प्रयोग शाळेचे संचालक प्रा. एडवर्ड अमालादी, प्रा. कार्लो कास्तागमोली आणि प्रा. ऑगस्टा मॅन फ्रेडनी यांनी “अँटी सिग्मा प्लस’ अणुकणाचा शोध लागल्याचे जाहीर केले. या शोधामुळे इटली अणुसंशोधनात रशिया व अमेरिकेचा दर्जा सहज गाठू शकेल असे मत इटलीतील “पाएसा से रा’ या सायंदैनिकाने व्यक्त केले आहे. अँटी सिग्मा प्लस कणाचा व्यावहारिक उपयोग कितपत होऊ शकेल याबद्दल काहीच सांगता येणार नाही, असे मत इटलीतील सुप्रसिद्ध गणितज्ज्ञ प्रा. मार्सेलो विनी यांनी व्यक्त केले आहे.
5 आणि 10 हजारांच्या नोटा
मुंबई – रिझर्व्ह बॅंक लवकरच 5 आणि 10 हजारांच्या नोटा काढणार आहे असे जाहीर करण्यात आले आहे. या नोटांवर सध्याचे बॅंकेचे गव्हर्नर व्ही. आर. अय्यंगार यांचीच स्वाक्षरी राहील. नव्या दिल्लीच्या करन्सी ऑफिसरतर्फे देण्यात येणाऱ्या नोटांवर “नवी दिल्ली’ ऐवजी “दिल्ली’ असे छापण्यात येईल. बी. रामराव यांच्या सहीच्या नोटाही कायदेशीर राहतील असे जाहीर करण्यात आले आहे.
पंढरपूरची यात्रा दोन हजार वर्षे चालू आहे
मुंबई- महाराष्ट्राचे अधिदैवत असलेल्या श्रीविठ्ठलाचे पंढरपूर येथील देवस्थान दोन हजार वर्षांपूर्वीचे असून त्या काळापासून पंढरीच्या यात्रेला दरवर्षी लोक जात असल्याचा खात्रीलायक असा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध आहे असे इतिहासाचे अभ्यासक व टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या गणित विभागाचे प्रमख प्रा. कोसंबी यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र झाला म्हणून सीमा प्रदेशास विसरून जाऊ नका
बेळगाव- येत्या 27 तारखेस शिवजयंतीच्या दिवशी बेळगाव कारवार आदी मराठी भाषिक सीमा प्रदेश महाराष्ट्र राज्याला जोडण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करण्यासाठी मिरवणुका आणि जाहीर सभा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कृतीसमितीने कालच्या बैठकीत घेतला. द्विभाषिक मोडून महाराष्ट्र राज्य स्थापन होत असताना संयुक्त महाराष्ट्र समितीचे विसर्जन होणार असेही वृत्त येत आहे. त्याबद्दल कृतीसमितीने खेद व्यक्त केला आहे.