61 वर्षांपूर्वी प्रभात : महाराष्ट्र राज्याची सरकारी कारभाराची भाषा मराठी राहणार

ता. 23, माहे एप्रिल, सन 1960

मुंबई, ता. 22 – नवमहाराष्ट्राची राज्यकारभाराची भाषा मराठी राहील, असा अनौपचारिक निर्णय मुंबई मंत्रिमंडळाने घेतल्याचे समजते. महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी अधिवेशनात त्यासंबंधीचे विधेयक मांडण्यात येईल असे समजते. महाराष्ट्राची राज्यकारभाराची भाषा मराठी व गुजरातची गुजराती असावी, अशी शिफारस मुंबई सरकारने डॉ. जीवराज मेहता यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या “राज्य भाषा समिती’ने केली आहे. 

हिंदी भाषा अधिकृतपणे वापरात येईपर्यंत राज्याराज्यांतील व केंद्र सरकारबरोबरील पत्रव्यवहार इंग्रजी भाषेतून चालू राहावा, असेही या समितीने सुचविले आहे. प्रादेशिक भाषांचा उपयोग सुरू करण्याची योजना तयार करण्यासाठी महाराष्ट्र व गुजरात या राज्यांत “डायरेक्‍टोरेटस ऑफ लॅंग्वेजेस’ सुरू करावीत, अशीही शिफारस करण्यात आल्याचे समजते.

परकी राष्ट्रांच्या राष्ट्रध्वजाशी मिळती-जुळती भारतीय पक्षांची निशाणे
नवी दिल्ली – एखाद्या परक्‍या राष्ट्राचे निशाण आपल्या पक्षाचे निशाण म्हणून भारतातील कोणी पक्ष वापरीत आहे की काय याची सरकारला माहिती नाही, असे गृहमंत्री पं. पंत यांनी आज लोकसभेत सांगितले. एखाद्या पक्षाचे निशाण परक्‍या राष्ट्राच्या निशाणीशी मिळते-जुळते आहे काय असा प्रश्‍न घोषाल यांनी विचारला होता.

त्यावर पं. पंत म्हणाले, मिळते-जुळते हा शब्दप्रयोग लवचिक आहे. त्यामुळे अमुक एक वस्तू-गोष्ट अमक्‍या तमक्‍यांसारखी दिसते असे म्हणता येण्यासारखे असते. तथापि परक्‍या राष्ट्रासारखेच एखादे निशाण येथे नाही, एखाद्या परक्‍या राष्ट्राचे निशान भारतीय राजकीय पक्षांनी स्वीकारू नये असा येथे कायदा नाही. पण देशनिष्ठ नाही याचे निदर्शक म्हणून कोणी परकी निशाणाचा वापर करील तर मात्र त्याचा विचार करावा लागेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.