पणजी –देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. आता कॉंग्रेसने गोव्यासाठी आपला जाहीरनामा सादर केला आहे. यामध्ये राहुल गांधींचा ड्रीम प्लॅन असलेल्या “न्याय’ योजनेचा समावेश आहे. गोव्यात कॉंग्रेस सत्तेत आल्यास आर्थिक दुर्बल घटकांना महिन्याकाठी सहा हजार रुपये म्हणजे वर्षाला 72 हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे गोव्याच्या विधासभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असताना त्यांनी पक्षाचा जाहीरनामा सादर केला. राहुल गांधी म्हणाले, गोव्यातील लढत ही प्रामुख्याने कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशीच आहे. गोवेकर जनतेने आपले मत वाया घालवू नये, सत्तेत कोण यावे हे आता गोवेकरांनी ठरवावे.
दरम्यान, “न्याय’ म्हणजे न्यूनतम आय योजना होय. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने याचे आश्वासन दिले होते. ही योजना राहुल गांधी यांची ड्रीम स्कीम असल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेचे अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी समर्थन केले आहे. “न्याय’ योजना राबविण्याचे दिले आश्वासन