मातृवंदना योजनेचा 60 हजार 861 महिलांना मिळाला लाभ!

* मातृवंदना योजनेत नगर राज्यात पहिल्या क्रमांकावर
* वर्षभरात 3 हजार शिबिरे
* मातृवंदना योजनेत 24 कोटी 33 लाख 19 हजाराचे अनुदान वाटप !
कबीर बोबडे
नगर – महिला व बालकांच्या कल्याणाकरिता शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना सकस आहार घेण्याबाबत प्रोत्साहित करण्यासाठी, तसेच माता मृत्यू आणि बालमृत्यूच्या दरात घट व्हावी, यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सप्टेंबर 2017 मध्ये सुरु केली आहे. आजवर 60 हजार 861 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला.
जिल्हा आरोग्य विभागाने दोन वर्षाच्या कालावधीत या योजनेंची प्रभावी अंमलबजावणी केल्याचे आकडेवारीतून लक्षात आले. 16 डिसेंबर 2017 ते 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत जिल्ह्यातील चौदा तालुक्‍यात 1 लाख, 65 हजार 375 लाभार्थी महिलांनी नोंदणी केली. त्यातील 60 हजार 861 महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. या लाभार्थी महिलांना 24 कोटी, 33 लाख, 19 हजार रुपयाचे अनुदान त्यांच्या बॅंक खात्यात जमा केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत अकोले तालुक्‍यात लाभार्थांची संख्या 4009, जामखेड -2239, कर्जत-3281, कोपरगाव-2947, नगर -4403, नेवासा – 4470, पारनेर – 3734, पाथर्डी – 3051, राहता – 4129, राहूरी – 3602, संगमनेर – 5934, शेवगाव – 4007, श्रीगोंदा -3590, तर श्रीरातपूरमध्ये 2927 एवढी लाभार्थ्यांची संख्या आहे. जिल्ह्यात मातृवंदना योजनेच्या लाभार्थी महिलांची एकूण टक्केवारी 84 टक्के असून जिल्ह्यात शेवगाव, राहता आणि नगर हे तालुके योजनेच्या अंमलबजावणीत अव्वल ठरते तर, श्रीरामपूर आणि राहुरी हे तालुके पिछाडीवर आहेत. त्यामुळे 2 ते 9 डिसेंबर या दरम्यान मातृवंदना सप्ताह साजरा करण्यात येणार असून त्या सप्ताह्यात जिल्ह्यातील गरोदर माता व बालकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

राज्यात नगर जिल्हा या योजनेच्या प्रभावी अंमलबजाणी अव्वल ठरला असून या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाभरात 3 हजार 170 आशा वर्कर्स मार्फत ही योजना राबविली जाते. या आशा वर्कर्स प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरी जाऊन योजनेविषयी माहिती देऊन तसेच त्यांच्याकडून फॉर्म भरुन घेतात, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी सांगितले.

कोण असेल लाभार्थी ?
महिला व बालविकास मंत्रालयातर्फे योजना 2017 पासून राबविली जात आहे. गर्भधारणेच्या अवस्थेत महिलेला बालसंगोपनासाठी आर्थिक मदत मिळावी याकरिता ही योजना आहे. पूर्वी इंदिरा गांधी मातृत्व सहकारिता योजना, या नावाने ही सुरु होती. सध्या ही योजना प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या नावाने सुरु आहे. 19 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला या योजनांच्या लाभार्थी आहेत. या योजनेंतर्गत सरकारने पाच हजार रुपयांची लाभार्थ्यांसाठी तरतूद केली आहे.

मातृवंदना योजनेचे अनुदान तीन टप्प्यांत हे मिळते. आतापर्यंत ज्या लाभार्थ्यांना ही रक्कम मिळाली नाही, त्यांची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेचे पैसे वरिष्ठ स्तरवरून लाभार्थ्याच्या खात्यात जमा होतात. आम्ही फक्त लाभार्थ्यांची माहिती देतो. आतापर्यंत या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून राज्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नगर जिल्हा आघाडीवर आहे. उर्वरित लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणी असतील, तर त्या लवकर सोडवून त्यांना लाभ मिळविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू.
– डॉ. एस. एन. सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here