पुर्व आंबेगावात 60 मेंढ्यांचा मृत्यू

अतिवृष्टीमुळे शेळ्या मेंढ्यांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव

पारगाव शिंगवे-आंबेगाव तालुक्‍यात अतिवृष्टीने ओढे-नाले भरभरून वाहत असून तसेच शेतजमिनीत पाण्याचा निचरा होत असल्याने सर्वत्र दलदल निर्माण झाली आहे. यामुळे शेळ्या मेंढ्यांवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने दररोज शेळ्या व मेंढ्या उपचार करुनही दगावत असून मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. गेली काही दिवसांत जवळपास 60 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन विभागाकडून कोणतही उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे मेंढपाळ व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

शेळ्या मेढ्यांचे पाय तसेच कान, नाक, तोडांना सूज येत असून खुरांना जंतुसंसर्ग झाल्याने जखमा होऊन त्यातून रक्त येत आहे. यामध्ये दुर्गंधी येऊन अळ्या पडणे, चालताना लंगडत चालणे, ताप येणे तसेच एकाच ठिकाणी झोपून रहाणे अशा प्रकाराची लक्षणे दिसून येतात यामुळे मेंढ्यांचा मृत्यू होत आहे. पूर्व भागातील वळती येथे दगडू सिताराम दळे यांच्या 10 मेंढ्याचा मूत्यू झाला. संतोष नामदेव भोर 6 मेंढ्या, तसेच नरहरी श्रीपती शिंदे 9 मेंढ्या, मांजरवाडीच्या रामा नाथा ठवरे 20 शेळ्या मेंढ्या व सोनबा न्हनाजी माने 15 मेंढ्या विषाणूजन्य रोगामुळे दगावल्या आहेत. मोठ्या प्रमाणात उपचार करून शेळ्या मेंढ्यांचा मूत्यू होत असल्याने मेंढपाळामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

तालुक्‍यात ओढे-नाले पाण्याने भरभरून वाहत आहेत. तसेच शेतजमिनीतील ओलही कमी झालेली नाही. पाण्यामुळे सर्वत्र दलदल निर्माण झाली आहे. पाणीही दूषित झाले आहे, त्यातच हिरचा चाराही कुजून गेलेला आहे. यामुळे जनावरांना साथीच्या रोगांची लागण झाली. तालुक्‍यात पाणी व हिरवा चारा उपलब्ध असल्याने नगर जिल्ह्यातून मेंढपाळ मोठ्या संख्येने चारा-पाण्यासाठी तालुक्‍यात येत असतात; परंतु अतिवृष्टीमुळे शेळ्या व मेढ्यांना विषाणूजन्य रोगाची लागण झाली असल्याचे मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • डॉक्‍टरांचा सल्ला
    शेळ्या मेंढ्यांची बसण्याची जागा स्वच्छ ठेवावी तसेच लसीकरण करण्यात यावे. लगण झालेल्या मेढ्या एक बाजूला ठेवून औषधोपचार करण्यात यावे. हिरवा चारा देतात तो स्वच्छ आहे का ते पाहावे, असा सल्ला डॉक्‍टरांकडून देण्यात येत आहे.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)