अकोला – करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या लाटेमध्ये लहान बालकांना अधिक धोका असल्याची भीती व्यक्त केली जात असताना आज बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील सहा महिन्याच्या चिमुकलीचा करोनामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
सहा महिन्याच्या या चिमुकलीला जन्मपासून हृदयात छिद्र होते. त्यामुळे या बालिकेला हृदयविकार सुद्धा होता. दरम्यान रुग्णलायत दाखल केल्यानंतर तिची करोना चाचणी करण्यात आली त्यामध्ये तिला करोना असल्याचे निदर्शात आले. करोना झाल्याचे कळल्यावर लगेच येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या चिमुकलीचा मृत्यू झाला.
या चिमुकलीला करोना असला तरी हृदयात छिद्र असल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दिली आहे. जिल्ह्यात लहान बालकांमध्ये करोनाचा धोका अधिक होताना दिसून येत आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाकडून बारा ते पंधरा पर्षाखालील बालकांची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.