नवी दिल्ली : दहशतवादी आणि बंडखोरांच्या विरोधातील मोहिमांवेळी अतुलनीय कामगिरी करणाऱ्या लष्कराच्या 6 जवान आणि अधिकाऱ्यांना शौर्य चक्र सन्मान जाहीर झाला आहे.
त्यातील एका जवानाचा मरणोत्तर सन्मान केला जाणार आहे. लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा, मेजर कोंजेंगभाम बिजेंद्र सिंह, नायब सुभेदार नरेंद्र सिंह, नाईक नरेश कुमार आणि शिपाई करमदेव ओरिओन यांना शौर्य चक्र प्रदान केला जाणार आहे.
त्याशिवाय, शौर्य चक्र जाहीर झालेल्यांमध्ये शहीद नायब सुभेदार सोमबीर यांचा समावेश आहे. मागील वर्षी जम्मू-काश्मीरात एका चकमकीत लष्कराच्या पथकाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यावेळी सोमबीर यांनी एका परदेशी दहशतवाद्याला ठार केले. त्या चकमकीत सोमबीर यांना वीरमरण आले.