देशात अवघ्या 49 दिवसांत आढळले 6 लाख करोनाबाधित

सलग पाचव्या दिवशी 20 हजारांहून अधिक संख्येची भर

नवी दिल्ली -देशात सलग पाचव्या दिवशी मंगळवारी करोनाबाधितांमध्ये 20 हजारांहून अधिक संख्येची भर पडली. बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे देशाने याआधीच 7 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या 1 लाख होण्यास 110 दिवसांचा कालावधी लागला. मात्र, पुढील अवघ्या 49 दिवसांत बाधितांच्या संख्येत तब्बल 6 लाखांची भर पडली.

देशात सोमवार सकाळपासून 24 तासांत नव्या 22 हजार 252 करोनाबाधितांची नोंद झाली. त्या कालावधीत आणखी 467 बाधित दगावले. देशातील करोनाबळींच्या संख्येने याआधीच 20 हजारांचा टप्पा पार केला आहे. देशात सर्वांधिक बाधित आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे.

महाराष्ट्रातील बाधितांची संख्या 2 लाखांवर आहे. तमिळनाडू आणि दिल्लीनेही बाधित संख्येत 1 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. गुजरातमध्ये 37 हजार बाधित आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 9 हजारांहून अधिक बाधित दगावले आहेत. त्याखालोखाल दिल्लीत 3 हजारांहून अधिक बाधित मृत्युमुखी पडले आहेत. गुजरातमधील करोनाबळींची संख्या 2 हजारांच्या घरात आहे.

देशात एकीकडे बाधित आणि बळींच्या संख्येत मोठी भर पडत आहे. तर, दुसरीकडे बाधित करोनामुक्‍त होण्याच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात सध्या सुमारे 2 लाख 60 हजार सक्रिय बाधित आहेत. तर आतापर्यंत जवळपास 4 लाख 40 हजार बाधित बरे झाले आहेत. करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे देशातील प्रमाण 61.13 टक्के इतके झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.