एसएसटी पथकाकडून 6 लाखांची रोकड हस्तगत

कोळगाव – श्रीगोंदा तालुक्‍यातील चिखली घाटात शनिवारी श्रीगोंदा निवडणूक एसएसटी पथक क्र. 5 चे प्रमुख डी.बी डफळ यांच्या पथकाने सुमारे 6 लाख रुपये चारचाकी गाडीतून घेऊन जात असताना पकडले. पंचनामा करून पकडलेली रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कोषागारात जमा करण्यात आल्याची माहिती पथक प्रमुख डफळ यांनी दिली.

याबाबत माहिती अशी की, सध्या लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत असल्याने निवडणूक आयोगाची आर्थिक परिस्थितीवर नजर आहे. निवडणूक आयोगाने प्रत्येक तालुक्‍यात ठिकठिकाणी चेकपोस्ट तयार केले आहेत. दरम्यान शनिवारी (दि.6) दुपारी 1 च्या सुमारास नगरकडून काष्टीकडे जाणारी चारचाकी ही चिखली घाटात चेकपोस्टवर चेक केली असता, या गाडीमध्ये रोख रक्कम 5 लाख 98 हजार 500 रुपये आढळून आली.

याबाबत पथकप्रमुख डफळ यांनी गाडीतील पांडुरंग अण्णा नरळे (रा. पानवन, ता. मान, जि. सातारा) यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितले, आम्ही जेसीबी घेण्यासाठी नगर येथे गेलो होतो, मात्र आमचा व्यवहार न झाल्याने, आम्ही राशीन येथे दुसरे जेसीबी पाहण्यासाठी चाललो आहोत, मात्र जवळील रक्कमेबाबत पुरावे देऊ शकले नाहीत, त्यामळे पकडलेली रक्कम पथकाने जप्त केली. पंचनामा करून पकडलेली रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कोषागारात जमा करण्यास पाठविण्यात आली. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविल्याचे डफळ यांनी सांगितले. या कारवाईत पोलीस नाईक एस. यु. गोमसाळे, एन. एम. पठारे, पोलीस कर्मचारी व्ही.बी. गांगर्डे यांनी कामगिरी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.