ब्रासिलिया, (ब्राझिल) – ब्राझिलमधील एका तलावात धबधब्याजवळचा कडा नौकाविहार करणाऱ्या दोन बोटींवर अचानक कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान 6 जणांचा मृत्यू झाला. या अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे किमा 20 जण बेपत्ता आहेत.
त्या सर्वांचा शोध सुरू आहे. जे लोक बेपत्ता झाले आहेत, त्यांच्या शोधासाठी पाणबुड्याची मदत घेण्यात येत असल्याचेही मिनास ग्रेसियास प्रांताच्या अग्निसामक दलाचे कमांडर एडगार्ड इस्टेव्हो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या दुर्घटनेत 32 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी बहुतेकांना प्राथमिक उपचारांनंतर शनिवारी संध्याकाळीच रुग्णालयातून घरी सोडून देण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या दुर्घटनेमागील नेमक्या कारणांचा शोध घेतला जाईल, असे मदतकार्यात सहभागी झालेल्या ब्राझिलच्या नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
साओ जोस दा बारा आणि कॅपिटोलिओ या दोन शहरांमध्ये असलेल्या फर्नास तलावामध्ये अनेक जण मौकाविहार करत असताना जवळच्या धबधब्याशेजारील कड्याचा एक भाग सुटा होऊन अचानक या बोटींवर कोसळला.