कराची – पाकिस्तानमधील दहशतवाद विरोधी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये इसिस या दहशतवादी संघटनेत्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या नैऋत्येकडील क्वेट्टा शहरात ही कारवाई करण्यात आली.
काल रात्री क्वेट्टा शहरातील इस्टर्न बायपासच्या परिसरात “सीटीडी’च्या पोलिसांनी ही धडक कारवाई केली. हे दहशतवादी क्वेट्टा शहरात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट करत होते, असे पोलिसांनी सांगितले.
गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनंतर घातलेल्या छाप्याच्यावेळी पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यावेळी पोलिसांना दहशतवाद्यांच्या अड्ड्यावरून शस्त्रे. दारुगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा आढळून आला. त्यामध्ये 3 मशिनगन, 200 काडतुसे, 9 एमएमची 2 पिस्तुले, पिस्तुलांची 47 काडतुसे, हातबॉम्ब आणि दोन मोटरसायकलींचा समावेश आहे.
ठार झालेल्यांपैकी एका दहशतवाद्याची ओळख पटली असून त्याचे नाव असगर समालानी असे आहे. त्याच्यावर 20 लाख रुपयांचे बक्षिस होते. त्याच्यासह इतर दहशतवादी या चकमकीमध्ये मारले गेले, असे “सीटीडी’ च्या प्रवक्त्यांनी सांगितले. या वेळी अंधाराचा फायदा घेऊन इतर 4 ते 5 दहशतवादी निसटून पळून जाण्यात यशस्वी झाल्याचेही या प्रवक्त्याने सांगितले.