इस्लामपूर – राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांच्या असणाऱ्या ठेवीवरील २१ महिन्याचे व्याज सभासद- बिगर सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केले असल्याची माहिती राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील यांनी दिली. ही रक्कम रुपये ६ कोटी २० लाख इतकी आहे.
ऊस उत्पादक सभासद-बिगर सभासदांच्या आमच्या साखर कारखान्याकडे को-जनसह काही ठेवी आहेत. या ठेवीवरील व्याज आम्ही एप्रिल महिन्यात त्यांच्या बँक खात्या वर वर्ग करीत असतो. मात्र एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचे संकट अधिक गडद झाल्याने हे व्याज वर्ग करता आले नाही.
त्यामुळे सन २०१९-२० मधील १२ महिन्यांचे, व २०२०-२१ मधील ३१ डिसेंबर २०२० अखेरच्या ९ महिन्यांचे व्याज बिल बँक खात्यावर वर्ग केले आहे. पहिल्या वर्षाच्या १२ महिन्याचे रु.३ कोटी ५४ लाख ११ हजार,तर दुसऱ्या वर्षातील ९ महिन्यां चे २ कोटी ६६ लाख २९ हजार अशी ही रक्कम आहे. यानंतर प्रत्येक वर्षाच्या जानेवारी महिन्यात व्याज बिल बँक खात्यावर वर्ग केले जाणार आहे,याची ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी,असेही श्री.पाटील यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, संचालक विराज शिंदे, श्रेणीक कबाडे, एल.बी.माळी, दिलीपराव पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, चीफ अकौंटंट अमोल पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.