Home Loan Interest Rates: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) काही दिवसांपूर्वीच रेपो दरात 0.25 टक्के कपात करण्याची घोषणा केली. कपातीनंतर रेपो दर आता 6.50 वरुन 6.25 टक्के झाला आहे. यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला असून, घर खरेदी करणे सोपे झाले आहे.
आरबीआयने रेपो दरात बदल केल्यानंतर आता अनेक बँकांकडून गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. जवळपास 6 मोठ्या बँकांनी गृहकर्जावरील व्याजदर कमी केला आहे. यामुळे सध्या ज्यांनी कर्जा काढले आहे, त्यांचा कर्जाचा हफ्ता कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, नवीन घर घेण्यासाठी कर्ज काढण्याचा विचार करत असाल तरीही तुमच्याकडे चांगली संधी आहे.
कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांनी कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व बँकांकडून फ्लोटिंग दरावर गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना या कपातीचा लाभ मिळणार आहे.
या बँकांनी गृहकर्जावरील व्याजदर केला कमी
- बँक ऑफ बडोदाने गृहकर्जावरील व्याजदर 9.15 वरून 9.00 टक्के केले आहे. हे नवीन दर 10 फेब्रुवारी 2025 पासून लागू झाले आहेत.
- बँक ऑफ इंडियाने व्याजदरात केलेली कपात 7 फेब्रुवारी 2025 पासून लागू झाली आहे. बँकाने व्याजदर 9.35 टक्क्यांवरून 8.35 टक्के केला आहे.
- कॅनरा बँकेनेही व्याजदर 9.25 वरून 9.00 टक्के केला आहे.
- इंडियन ओव्हरसीज बँकेनेही व्याजदर 9.35 वरून 9.10 टक्के केला आहे. गृहकर्जावरील नवीन व्याजदर 11 फेब्रुवारी 2025 लागू झाली आहे.
- युनियन बँक ऑफ इंडियाने गृहकर्जावरील व्याजदर 9.25 वरून 9.00 टक्के केला आहे. याची अंमलबजावणी 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली आहे.
- पंजाब नॅशनल बँकेने गृहकर्जावरील व्याजदर 9.25 वरून 9.00 टक्के केला आहे. हा दर 10 फेब्रुवारी 2025 पासून लागू झाला आहे.
दरम्यान, या गृहकर्जावरील व्याज दरात कपात केल्याने नवीन घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे. यामुळे ग्राहकांना आता कमी व्याजदरात गृहकर्ज कमी होईल. याशिवाय, कर्जाचा हप्ता व कालावधी देखील कमी असेल.