मुंबई – येत्या दिवाळीपर्यंत देशातील पाच महत्त्वाच्या शहरांमध्ये रिलायन्स जिओ कंपनीची 5 जी दूरसंचार सेवा (5G services) सुरू होईल, अशी घोषणा उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी केली आहे. आज कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, डिसेंबर 2023 पर्यंत देशातल्या सर्व शहरांमध्ये 5 जी सेवा सुरू होईल. सुरुवातीच्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता या शहरांमध्ये ही सेवा सुरू होईल. या सेवेच्या नेटवर्कसाठी कंपनी दोन लाख कोटी रुपये खर्च करीत आहे, असे ते म्हणाले. रिलायन्स जिओ कंपनीकडे देशातील सर्वात मोठे 5 जी नेटवर्क असेल असेही त्यांनी म्हटले आहे.
5 जी हे दूरसंचार क्षेत्रातील अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान आहे. त्याद्वारे ग्राहकांना कमालीच्या वेगाने डेटा स्पीड मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या 5 जी स्पेक्ट्रम लिलावात जिओ कंपनीने 700 मेगाहॅर्टझ स्पेक्ट्रम प्राप्त केले आहेत. ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी ही स्पेक्ट्रम क्षमता पुरेशी आहे, असेही मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. (5G services to be launched in ‘these’ 5 cities by Diwali – Mukesh Ambani)