सायबर गुन्ह्यांची शिकार होतात 59 टक्के प्रौढ व्यक्ती

नॉर्टन सायबर सेफ्टी इनसाइट रिपोर्टचा अहवाल धक्कादायक

नवी दिल्ली – नॉर्टनलाइफलॉक या सायबर सुरक्षेतील जागतिक आघाडीवरील कंपनीने आज त्यांच्या 2021 नॉर्टन सायबर सेफ्टी इनसाइट रिपोर्ट मधील निष्कर्ष प्रसिद्ध केले असून त्यानुसार 59 टक्के भारतीय प्रौढ व्यक्तींना गेल्या 12 महिन्यांत सायबरक्राइमच्या शिकार झाल्या आहेत. सायबर गुन्ह्यांना बळी पडलेल्यांनी या समस्या सोडवण्यासाठी तब्बल 1.30 अब्ज तास खर्ची घातले आहेत.

सहावा वार्षिक नॉर्टन सायबर सेफ्टी इनसाइट रिपोर्ट हे सर्वेक्षण द हॅरिस पोलच्या सहकार्याने ऑनलाइन करण्यात आले. यात भारतातील 1000 प्रौढांसह 10 देशांमधील दहा हजार प्रौढांचा समावेश होता. या सर्वेक्षणानुसार मागील 12 महिन्यांमध्ये 59 टक्के भारतीय प्रौढांना त्यांचे बॅंक खाते किंवा मोबाईल उपकरणाला अनधिकृतपणे हाताळले गेल्याचा अनुभव आला. आपल्या अकाऊंट किंवा डिव्हाइसचा अनधिकृत वापर होत असल्याचे लक्षात आल्यानंतरही फक्त 36 टक्के लोकांनी सिक्‍युरिटी सॉफ्टवेअर खरेदी केले किंवा असलेले सेक्‍युरिटी सॉफ्टवेअर वाढवून घेतले. तर 52 टक्के लोकांनी आपल्या मित्रपरिवाराकडे साह्य मागितले, 47 टक्के लोकांनी ज्या कंपनीतून अकाऊंट हॅक झाले त्यांना समस्या सोडवण्यासाठी पाचारण केले.

याबाबत बोलताना नॉर्टनलाइफलॉकचे भारतचे मार्केटिंग संचालक रितेश चोप्रा म्हणाले की, लॉकडाऊन आणि निर्बंधांच्या काळात सायबर गुन्हेगार मागे हटले नव्हते. मागील महिन्यांत अनेक भारतीय प्रौढ व्यक्ती आयडेंटिटी थेफ्टला बळी पडल्या आणि डेटाच्या खासगीपणाची चिंता वाढीस लागली आहे. या अहवालात नमूद केल्यानुसार अनेक भारतीय ग्राहक (90 टक्के) आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षणात्मक पावले उचलत आहेत, दर 5 पैकी 2 व्यक्तींना वाटते की, सध्याच्या काळात खासगीपण जपणे अशक्‍य आहे (42 टक्के) किंवा ते कसे करावे हे माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले (42 टक्के).

त्यामुळे ग्राहकांनी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि आपले ऑनलाइन खासगीपण सुरक्षित करणे महत्त्वाचे आहे. शिवाय दूरस्थ पद्धतीने काम केल्याने अनेक भारतीय सायबर धोक्‍यांना अधिक बळी पडत असावेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.