पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधितांच्या आकड्याने आणखी वेग वाढविला असून आज दिवसभरात 59 जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये शहरातील 56 जणांचा तर शहराबाहेरील तिघांचा समावेश असून शहरातील बाधितांचा आकडा 843 वर पोहोचला आहे. तर आज दिवसभरात एका पुरुषाचा करोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत शहरातील 481 करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सोमवारी प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (मंगळवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार तब्बल 59 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आजच्या बाधितांमध्ये 36 पुरुषांचा आणि 23 महिलांचा समावेश आहे. 36 पुरुषांपैकी तीन पुरुष हे शहराबाहेरील आहेत. शहरातील बाधित हे रुग्ण कस्पटेवस्ती वाकड, अजंठानगर, खंडोबामाळ, आनंदनगर, पवारवस्ती, पाटीलनगर चिखली, नानेकर चाळ पिंपरी, गुलाबनगर दापोडी, जुनी सांगवी, बेलटिकानगर थेरगाव, गुरुदत्त कॉलनी वाल्हेकरवाडी, नवी सांगवी, नढेनगर काळेवाडी, दिघी, शाहूनगर चिंचवड, आदित्य बिर्ला कॉलनी थेरगाव येथील आहेत. तर शहराबाहेरील तीन पुरुष हे जळगाव व हडपसर येथील आहेत.
आज मयत 45 वर्षीय व्यक्ती ही जळगाव येथील रहिवाशी असून त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे शहरात मृत्यू झालेल्या करोना बाधितांची संख्या 33 वर पोहोचली असून त्यामध्ये शहराबाहेरील 19 जणांचा तर शहरातील 14 जणांचा समावेश आहे. आज मंगळवारी नव्याने 232 संशयित महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल झाले असून त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रतिक्षेतील संशयितांच्या चाचणी अहवालाची संख्या 362 वर पाहोचली आहे. आज 9 जणांना डिस्चार्ज दिल्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या 481 वर पोहचली आहे.