पुढील काही दिवस केवळ 1 हजार बसेसच्या माध्यमातून सेवा
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएमएल बसच्या 583 फेऱ्या रद्द केल्या आहेत. यामुळे, पुढील काही दिवस दोन्ही शहरांत केवळ 1 हजार बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा मिळणार आहे.
गेल्या चार दिवसांपासून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असून खासगी कंपन्यांकडून नोकरदारांना “वर्क फॉर्म होम’ दिले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकही घराबाहेर पडत नसल्याने याचा परिणाम प्रवासी संख्येवर झाला आहे. संख्या घटल्याने दोन्ही शहरांतील बहुतांशी बसच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात सुमारे 2 हजारहून अधिक बस आहेत. यातील 1500 ते 1600 बसेस रोज संचलनात असतात. मात्र, करोनामुळे दोन्ही शहरातील प्रवासी संख्येत लक्षणीय घट झाली आहे. परिणामी, शहरात पीएमपीएमएलच्या अनेक बस रिकाम्या धावत आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही शहरांतील विविध मार्गांवर धावणाऱ्या सुमारे 583 बसेसच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत.
आतापर्यंतचे नीचांकी उत्पन्न
शहरात पीएमपीच्या 1600 बस फेऱ्यांच्या माध्यमातून दैनंदिन उत्पन्न सुमारे दीड कोटींहून अधिक मिळते. मात्र, करोनामुळे प्रवासी संख्येत घट झाल्याने मागील 3 ते 4 दिवसांत दैनंदिन उत्पन्न कमी होत 80 ते 90 लाखांवर आले आहे. परिणामी, मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे एवढे नीचांकी उत्पन्न पीएमपीच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाल्याचे प्रशासनाने सांगितले.
केवळ गर्दीवेळी (पीक अव्हर्स) बसेसचे संचलन सुरू राहणार आहे. शहरात दुपारच्या सुमारास अनेक मार्गांवर गर्दी नसल्याने काही फेऱ्या रद्द केल्या आहेत. तसेच, फेऱ्यांचे योग्य नियोजन केल्याने नागरिकांची गैरसोय होणार नाही.
– अजय चारठाणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल