मेडिकलच्या प्रवेशासाठी 58 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज

कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 4 जुलैपर्यंत मुदत

पुणे – एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस आदी मेडिकलच्या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी तब्बल 58 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांनी राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या 26 केंद्रांवर कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावे लागेल. कागदपत्र पडताळणीसाठी दि. 4 जुलैपर्यंत मुदत आहे, अशी माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली. पुण्यात दोन केंद्र असून, त्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि टिळक आयुर्वेद महाविद्यालयांचा समावेश आहे.

राज्यातील खासगी आणि सरकारी महाविद्यालयातील मेडिकलच्या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया राज्य सीईटी सेलमार्फत राबविण्यात येत आहे. या सेलद्वारे मेडिकल प्रवेशासाठी दि. 27 जून पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती. या मुदतीत प्रवेशासाठी सुमारे 58 हजार 574 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना दि. 4 जुलै पर्यंत कागदपत्रांची पडताळणीसाठी मुदत आहे. याबाबतचे वेळापत्रक सीईटी सेलने संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे.

सीईटी सेलद्वारे कागदपत्र पडताळणी केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील सुमारे 26 पडताळणी केंद्र निश्‍चित करण्यात आली आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या जिल्हानुसार पडताळणी केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या नीटच्या रॅंकनुसार कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असून याचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एनआरआय विद्यार्थ्यांना दि. 2 जुलैपर्यंत मुंबईतील प्रवेश नियंत्रण प्राधिकरण येथे कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्‍यक आहे, असे राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.