मलकापूरला प्रधानमंत्री आवास योजनेत 576 घरांना मंजूरी

कराड – मलकापूर नगरपरिषद हद्दीतील झोपडपट्टी वासियांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 576 घरांना राज्य शासनाची मंजूरी मिळाली असल्याची माहिती मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या जाहिरनाम्यात झोपडपट्टी वासियांना पक्‍की घरे देण्याबाबत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केली असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

कराड शहरातील झोपडपट्टयांचे 1995 ते 1997 मध्ये मलकापूर नगपरिषद हद्दीमध्ये पुनर्वसन करण्यात आले होते. त्यांना मलकापूर ग्रामपंचायत व नगरपंचायतीकडून सर्व नागरी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तसेच पक्की घरे मिळवून देण्याकरीता सर्वेक्षण करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे 2022 ही संकल्पना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जाहिर करण्यात आली. यामध्ये ज्या नागरिकांना जागेची उपलब्धता आहे परंतु आर्थिकदृष्ट्या घर बांधू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही योजना वरदायिनी आहे. याअंतर्गत म्हाडाच्या विभागीय कार्यालयामार्फत गृहनिर्माण प्राधिकरणास प्रस्ताव देण्यात आला होता.

नुकत्याच झालेल्या मलकापूर नगपरिषद पंचवार्षिक निवडणुकीनंतर या प्रस्तावास तातडीने मान्यता मिळावी याकरिता प्रयत्न करण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी शिफारस केली होती. त्यानुसार सदर प्रस्तावास मंजूरी मिळून पुढील कार्यवाहीसाठी व निधी उपलब्धतेसाठी गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

या प्रकल्पामध्ये झोपडपट्टीच्या जागेवर 24 सदनिका असणाऱ्या 15 इमारती बांधण्यात येणार आहेत. तर कमी खर्चाची एकूण 216 घरे बांधण्यात येणार आहेत. राज्य व केंद्र शासन यांच्याकडून मिळणारे अनुदान याचा विचार करता पालिकेने कमीत कमी खर्चात झोपडपट्टी वासियांना पक्के घरे देण्याबाबत नियोजन केले आहे. या प्रकल्पामध्ये घटक क्रमांक 1 करिता 12.60 कोटी, घटक क्रमांक 4 साठी 2.80 कोटी अशी एकूण 15.40 कोटीचे अनुदान घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.

मंत्रालय स्तरावर झालेल्या बैठकीत उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, ज्ञानदेव साळुंखे, नगरअभियंता शशिकांत पवार, प्रधानमंत्री आवास योजनेचे अभियंता निलेश पाटील उपस्थित होते. याकामी माजी नगराध्यक्षा सुनिता पोळ, नगराध्यक्षा निलम येडगे व नगरसेवक राजेंद्र यादव यांचे सहकार्य मिळाल्याचे नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.