पुणे : कंत्राटदाराने धान्याची उचल उशिरा केल्याने शहर आणि ग्रामीण भागातील 90 टक्केच ग्राहकांना धान्य वाटप झाले आहे. शहरात दर महिन्याला सरासरी 90 ते 92 टक्के आणि जिल्ह्यात 98 टक्के धान्य वाटप होत असते. मात्र, नोव्हेंबर महिन्यात कंत्राटदाराने धान्य उशिरा पोहोचविल्याने जिल्ह्यातील 8 ते 9 टक्के ग्राहक अजूनही धान्यापासून वंचित राहिल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात 6 लाख 29 हजार 896 शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना 1 हजार 857 रेशन दुकानांच्या माध्यमातून धान्याचे वाटप करण्यात येते. अंत्योदय योजनेत 754 टन गहू, तर 907 टन तांदूळ दिला जातो. प्राधान्य योजनेत 4 हजार 720 टन गहू व 7 हजार 183 टन तांदूळ वाटप केला जातो. त्या- त्या महिन्याचे धान्यवाटप 30 तारखेपर्यंत करावे लागते. यानंतर ई-पीओएस मशिन बंद होतात. त्यामुळे उर्वरित ग्राहकांना धान्य वाटप करता येत नाही.
नोव्हेंबर महिन्यात 6 लाख 29 हजार 896 शिधापत्रिकांपैकी 5 लाख 72 हजार 133 म्हणजेच 90.82 टक्के ग्राहकांना धान्यांचे वाटप झाले आहे. जिल्ह्यात दर महिन्याला सरासरी 98 ते 99 टक्के ग्राहकांना धान्य वाटप होते. कंत्राटदाराने केलेल्या गोंधळामुळे रेशन दुकानदारापर्यंत धान्य वेळेत पोहोचू शकले नाही. यामुळे नोव्हेंबर महिन्यात 57 हजार 763 शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळाले नाही.