दाबोळी विमानतळावर 57 लाखाचे सोने जप्त

पणजी : गोवा कस्टम विभागाने दाबोळी विमानतळावर केलेल्या धडक कारवाईत 57 लाख रुपये किमतीचे तस्करीचे सोने एका हवाई प्रवाशाकडून जप्त केले. ही कारवाई करण्यात आलेली असून या प्रकरणी कर्नाटकातील भटकळ येथील हवाई प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले आहे. हे सोने दीड किलोहून अधिक वजनाचे आहे.

कस्टमच्या पथकाने 57 लाख 67 हजार रुपये किंमतीचे सोने भटकळ येथील हवाई प्रवाशाकडून जप्त केले.हा प्रवाशी ओमान एअरवेजमधून दुबई ते गोवा व्हाया मस्कत या हवाईमार्गे दाबोळी विमानतळावर उतरला होता. विमानतळावर पोहोचल्यानंतर व विमानतळ आवाराबाहेर पडण्यापूर्वी झालेल्या तपासणीत त्याच्याकडे हे सोने सापडले.

हे सोने त्याने आपल्या बॅगेमध्ये लपवले होते. या सोन्याचे वजन दीड किलो 38 ग्रॅम आहे. हे सोने बिस्किटांच्या स्वरूपात होते. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी तस्करीचे सोने व त्या हवाई प्रवाशालाही ताब्यात घेतले आहे.

दाबोळी विमानतळावर तस्करीचे सोने उतरविले जाणार असल्याची गुप्त माहिती विमानतळावरील गोवा कस्टम विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पाळत ठेवून कस्टमच्या पथकाने ही कारवाई केली.

ही कारवाई गोवा कस्टम विभागाचे साहाय्यक आयुक्त व्हाय. बी. सहारे, जुलीएट व संयुक्त आयुक्त प्रज्ञशिल जुमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गोवा कस्टम आयुक्त मिहिर रंजन यांच्या सर्वकष मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली असून पुढील तपास त्यांच्याच मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

दरम्यान, गोवा कस्टम विभागाने एप्रिल 2019 पासून आतापर्यंत केलेल्या कारवाईत दाबोळी विमानतळावर 3 कोटी 43 लाख रूपये किमतीचे तस्करीचे सोने जप्त केलेले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.