पुणे : मध्य रेल्वेने भंगार साहित्यातून मुक्तता मिळविण्यासाठी “झिरो स्क्रॅप मिशन’ हा अत्यंत चांगला उपक्रम हाती घेतला आहे. यानुसार मध्यरेल्वेने दोन महिन्यांमध्ये तब्बल 57 कोटी 29 लाखांचे भंगार विकले आहे. मध्य रेल्वेच्या प्रत्येक विभागातील आणि कार्यशाळेमधील हे भंगार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये डब्बे, वॅगन, लोकोमोटिव्ह स्क्रॅप रुळ आदींचा समावेश असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रेल्वेच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. कारण, या उपक्रमामुळे रेल्वे स्टेशनचा परिसर स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होणार आहे. दरवर्षीच रेल्वे भंगार विकते. मात्र, गेल्या वर्षींच्या तुलनेत यावर्षी भंगार विक्रीतून रेल्वेला जास्त महसूल मिळाला आहे. 2021 मध्ये रेल्वेला 9 कोटी 21 लाखांचा महसूल मिळाला होता. यामुळे यंदा महसूलमध्ये भरघोस वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी मध्य रेल्वे भंगाराची विल्हेवाट लावते. यामधून मोठा महसूल देखील रेल्वेला मिळतो.
रेल्वेने विकलेल्या या भंगारामध्ये मध्य रेल्वेचे सर्व विभागातील भंगार साहित्य, कार्यशाळेतील साहित्य, शेड आणि विविध डेपोमधील सर्व भंगार विक्री करण्यात आले. या भंगार सामग्रीमध्ये स्क्रॅप रूळ, पर्मनंट-वे सामग्री, भंगार वापरात नसलेले साहित्य डब्बे लोकोमोटिव्ह इत्यादींचा समावेश आहे.
रेल्वे फक्त महसूलसाठीच भंगार विकत नाही. तर, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठीही हा उपक्रम राबविला जातो. शून्य स्क्रॅप मिशनचा एक भाग म्हणून कार्यशाळा, शेड आणि विविध डेपोवर असलेले भंगार हटविण्यात येत आहे. यामुळे रेल्वे स्टेशनचा परिसर स्वच्छ राहत आहे. स्टेशन परिसरामध्ये रेल्वेचे विविध साहित्य पडलेले असते. यामुळे अस्वच्छता दिसते. हे टाळण्यासाठी रेल्वेने हा खास उपक्रम हाती घेतला आहे.
– अनिलकुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे