पिंपरी – पवना धरणामध्ये शुक्रवार (दि. 27) अखेर 56.75 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत 15 टक्के आधिकचा पाणीसाठा यंदा उपलब्ध आहे. 20 जुलैपर्यंत हा पाणीसाठा पिंपरी-चिंचवड शहराला पुरू शकणार आहे. त्यामुळे नागरिकांना पुढील दोन महिने पाणीपुरवठा करण्यात अडचण जाणवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणात गेल्या वर्षी आजच्या तारखेला 41.14 टक्के इतका पाणीसाठा होता. गेल्या वर्षी 3.50 टीएमसी इतके पाणी धरणात होते. तर, यंदा आत्तापर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 4.83 टीएमसी इतके पाणी उपलब्ध आहे.
पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षी 3 हजार 367 मिमी इतका पाऊस झाला होता. तर, यंदा 4 हजार 57 मिमी इतका पाऊस झाला. ऑगस्ट-2019 पर्यंत पवना धरण तुडुंब भरले होते. चांगला पाऊस झाल्याने तब्बल तीन वेळा पवना धरण 100 टक्के भरले. मार्च अखेरीस देखील धरणामध्ये 56.75 टक्के इतके पाणी उपलब्ध आहे. महापालिकेने 25 नोव्हेंबर 2019 पासून नागरिकांवर दिवसाआड पाणीकपात लादली. 25 जानेवारी 2020 पर्यंत ही कपात असणार होती. परंतु, प्रशासनाने अनिश्चित काळासाठी कपात कायम ठेवली.