मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईमध्ये अनेक जण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. या मुंबई शहराने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला अनेक आघाडीचे कलाकार दिले. अनेक कलाकारांना स्वतःची एक ओळख मिळवून दिली. मागच्या काही वर्षांपासून हॉलिवूडचे कलाकारदेखील मुंबईमध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहेत.
याचदरम्यान हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी मुंबईत आलेल्या एका हॉलिवूडच्या अभिनेत्रीवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही पीडित अभिनेत्री मुंबईच्या मालाड परिसरात राहते. या अभिनेत्रीवर एका व्यक्तीने लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित अभिनेत्रीने बांगुरनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
आपल्या विरोधात फिर्याद दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत आरोपीला बेड्या ठोकल्या. बांगुरनगर पोलिसांनी आरोपीला चंदीगडमधून ताब्यात घेतले. त्याला अटक केल्यानंतर बोरिवली येथील स्थानिक कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. बांगुरनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.