दुष्काळी भागाने 55 वर्षांनंतर पाहिला “कऱ्हा’चा रुद्रावतार

बारामती शहरासह तालुक्‍यातील 21 हजार 500 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

काऱ्हाटी – पुरंदर तालुक्‍यात बुधवारी (दि. 25) रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे मध्यरात्रीपासून कऱ्हानदीला पूरस्थिती निर्माण झाली. तर नाझरे धरणातून 85 हजार क्‍युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याने 1965 नंतर कऱ्हानदीला पहिल्यांदाच म्हणजेच तब्बल 55 वर्षांनंतर पूर आला आहे. सुरेक्षेच्या उपाययोजना म्हणून बारामती तालुक्‍यातील 15 हजार व शहरातील 6 हजार 500 अशा एकूण 21 हजार 500 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

बारामती तालुक्‍यातील कऱ्हा नदी काठच्या आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, मोरगाव, तरडोली, बाबुर्डी, काऱ्हाटी, फोंडवाडा, जळगाव सुपे, जळगाव कप, अंजनगाव, कऱ्हावागज, बऱ्हाणपूर, नेपतवळण, मेडद तसेच बारामती शहरालगची खंडोबानगर, पंचशीलनगर, टकार कॉलनी, म्हाडा कॉलनी परिसरामध्ये पूराचे पाणी शिरले आहे. पूराच्या पाण्याचा धोका होण्याची शक्‍यता असल्यामुळे प्रशासनाने या गावातील नागरिकांना आधीच सुरक्षित स्थळी हलवले आहे.

नदीकाठच्या गावातील नागरिकांनी घरातील सर्व वस्तू सुरक्षितस्थळी हलवल्या आहेत. दरम्यान, बारामती-मोरगाव, जेजूरी-सासवड रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मध्यरात्री दोन वाजल्यापासून प्रशासनाकडून लाऊड स्पिकर लावून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे घाबरून आधीच नदी काठच्या नागरिकांनी घरे सोडली. मात्र, त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

दरम्यान, तालुक्‍यात आलेल्या पूरपरिस्थितीची प्रांताधिकारी कांबळे, तहसीलदार विजय पाटील, सहाय्यक निरीक्षक एस. के. लांडे, सहाय्यक उपनिरीक्षक राजाराम साळुंके, पाटबंधारेचे अजित जमदाडे, अश्‍विनी पानसरे, पोलीस पाटील संजय लोणकर, बारामती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती नगर परिषदेचे गटनेते सचिन सातव यांनीही पाहणी केली. पाण्याच्या वाढत्या प्रवाहापासून लांब राहण्यासाठी गस्त तयार केली परिसरातील रस्त्यांवर दगड लावून वाहतूक थांबविण्यात आली. बाबुर्डी, शेरेवाडी, काऱ्हाटी, माळवाडी, फोंडवाडा, जळगाव अंजनगाव, कऱ्हावागज याठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर पाणी प्रवाहाबरोबर झाडेझुडपे वाहत आल्याने बंधाऱ्यावर अडकून बसले आहे.

बारामतीमध्ये पुरामुळे शेतीचे, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, जीवितहानीही झाली आहे. मात्र, त्याची दाहकता अद्याप समोर आलेली नाही. नीरा आणि कऱ्हा दोन्ही नद्यांना पूर आल्याने काळजी घेणे आवश्‍यक आहे. पाण्याचा बऱ्यापैकी निचरा झाला असून परिस्थिती हळूहळू पूर्ववत होत आहे. नागरिकांनी घाबरु नये. याशिवाय सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहेत; शिवाय मुख्यमंत्र्यांनीही प्रशासनाला खबरदारी घेण्यास सांगितले आहे.
– अजित पवार, आमदार, बारामती विधानसभा मतदारसंघ


बारामती शहरातून जात असलेल्या कऱ्हा नदीला आलेली पूर परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. धरण क्षेत्रावरील पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे गुरुवारी (दि. 26) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नाझरे धरणातून विसर्ग कमी झाला आहे. सतर्कतेच्या दृष्टिकोनातून बारामती शहरातील 814 कुटुंबातील 3845 नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून स्थलांतरित करण्यात आले आहे. एनडीआरएफची तीन पथके बारामती शहरात दाखल झाले असून सध्या शहरातील पूरस्थिती आटोक्‍यात आहे.

– विजय पाटील, तहसीलदार, बारामती

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.