प्रवरा नदीकाठच्या 55 जणांना सुरक्षितस्थळी हलविले

संगमनेर  – भंडारदरा व निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारपासून भाद्रपद सरींची जोरदार वृष्टी सुरु आहे. धरणातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने निळवंडे धरणातून सोमवारी संध्याकाळी प्रवरा नदीपात्रात 35 हजार क्‍युसेक पाणी सोडले. नदीवरील सर्व लहान पूल पाण्याखाली गेल्याने पुरस्थिती निर्माण झाली होती. संगमनेर तालुक्‍यातील नदीकाठच्या पिंपरणे, ओझर, संगमनेर खुर्द, वाघापूर आणि चिखली शिवारातील सात कुटुंबांना जनावरांसह सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात शनिवारपासून पावसाचे पुनरागमन झाले.जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख व उपअभियंता अभिजित देशमुख परिस्थितीवर बारिक नजर ठेवून आहेत. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता भंडारदरा धरणातून 19 हजार 476 क्‍युसेक विसर्ग देण्यात आला. सायंकाळी त्यात वाढ होऊन रात्री उशिरा 35 हजार क्‍युसेक करण्यात आला. निळवंडे धरणातून रात्री बाराच्या दरम्यान 35 हजार क्‍युसेक पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे प्रवरेला पुरस्थिती निर्माण झाली होती. प्रशासनाच्यावतीने नदीकाठच्या गावांतील नागरीकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला होता.

दरम्यान सोमवारी रात्री प्रवरा नदीकाठच्या पिंपरणे येथील शेतमजुर दातीर यांचे कुटुंबातील 4 सदस्य, चिखली येथील सूर्यवंशी कुटुंबातील 4 सदस्य, संगमनेर खुर्द येथील छोट्या पुलाजवळील शेख कुटुंबातील 20 सदस्य, वाघापूर येथील जोर्वेकर कुटुंबातील 10 सदस्य, वाडापूर वस्ती येथील दोन कुटुंबातील 15 सदस्य, ओझर बुद्रूक येथील ललित सारंगधर मोरे यांचे कुटुंबातील 2 सदस्य असे एकून 55 सदस्य आणि 11 शेळ्या यांना प्रशासनाने ग्रामस्थांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलविले. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसिलदार अमोल निकम, निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम हे रात्री उशिरापर्यंत पुरपरिस्थितीवर लक्ष ठेवून होते. संगमनेर भागातील प्रवरानदीपात्राचा काठ धोक्‍यापासून दूर असल्याचे मंगळवारी सकाळी प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)